(अयोध्या)
अयोध्येत धावत्या रेल्वेमध्ये महिला कॉन्स्टेबलवर अत्याचार केल्याप्रकरणातील आरोपी अनिस रियाझ खान (वय 30) याचा ‘यूपी एसटीएफ’ने एका एन्काऊंटरमध्ये खात्मा केला. अयोध्येतील सावन मेळ्यादरम्यान शरयू एक्स्प्रेस ट्रेनमध्ये 30 ऑगस्ट रोजी महिला कॉन्स्टेबलवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपी अनिश दिनांक 22 सप्टेंबर रोजी पहाटे यूपी पोलिस आणि एसटीएफसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला. दुसऱ्या हल्लेखोरासह पुरकलंदर पोलीस ठाण्याचे प्रमुख आणि अन्य दोन हवालदार जखमी झाल्याची माहिती आहे. दोन अन्य आरोपी जखमी झाले. त्यांना अटक करण्यात आली आहे.
अयोध्येतील पुराकलंदर ठाण्यांतर्गत छतरिवा पारा कैल रस्त्यावर ही चकमक झाली. इनायतनगर भागात अनिस व अन्य आरोपी लपून असल्याचे ‘एसटीएफ’ला कळले. पोलिसांनी त्यांना घेराव घातला. अनिसने पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी उत्तरादाखल केलेल्या गोळीबारात आझाद तसेच विशंभर दयाल हे अन्य आरोपीही जखमी झाले.
पुराकलंदर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रतन शर्मा यांच्यासह दोन्ही जखमी कॉन्स्टेबल्सवरही उपचार सुरू आहेत. 30 ऑगस्ट रोजी शरयू एक्स्प्रेसमध्ये महिला हेड कॉन्स्टेबलवर अनिसने अत्याचार केला होता. रक्ताने माखलेली महिला कॉन्स्टेबल ट्रेनच्या सीटखाली पडली होती. विजार अंगावर नव्हती. या घटनेचा व्हिडीओही समोर आला होता. अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्वत:हून त्याची दखल घेतली होती. अनिस आणि त्याचे साथीदार गुन्हा घडल्यापासून फरार होते.
यूपीमध्ये सरासरी दर पंधरा दिवसांनी एक आरोपी ठार
आकडेवारीनुसार, यूपीमध्ये दर पंधरा दिवसांनी सरासरी एक आरोपी पोलिस चकमकीत मारला जातो. उत्तर प्रदेशात योगी सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्या 6-7 वर्षांत 190 हून अधिक कथित गुन्हेगार पोलीस चकमकीत मारले गेले आहेत. या काळात 5000 हून अधिक हल्लेखोरांना पोलिसांनी त्यांच्या पायात किंवा शरीराच्या इतर कोणत्याही भागावर गोळ्या झाडल्या पण त्यांचे प्राण वाचले.