( रत्नागिरी / प्रतिनिधी )
०१ मे २०२२ रोजी जामनगर तिरुवल्ली एक्सप्रेस मधून २७ लाख ८६ हजार रुपयांचा चोरी झाली होती. प्रशांत भिमराव माने ( ३९ वर्षे रा. मु.पो.मासोरणे ता. खटाव जि.सातारा) यांच्या ताब्यातील ही रक्कम अज्ञातांनी रेल्वेतून चोरून नेली होती. प्रशांत भिमराव माने यांनी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली होती.
त्यानुसार तत्कालीन पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखली मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सदाशिव वाघमारे, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. विनित चौधरी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक / शांताराम भाऊराव महाले, पोलीस उपनिरीक्षक/आकाश साळुंखे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील सर्व पोलीस अंमलदार इत्यादींनी या गुन्ह्याचा छडा लावता. अवघ्या 48 तासात आरोपींना ताब्यात घेतले होते. गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल रोख रक्कम २७ लाख ८६ हजार रुपये व ०६ आरोपीत यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून चोरीस गेलेली संपुर्ण रोख रक्कम व गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन हस्तगत करण्यात आले होते. सदर गुन्हयातील ०६ आरोपीत हे केरळ राज्य व सांगली, विटा येथे असल्याचे पोलिसाना समजले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेवून ४८ तासांच्या आत रत्नागिरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या.
पोलिसांनी ही रक्कम कोर्टात सादर केली होती. कोर्टाने 1 नोव्हेंबर 2022 रोजी ही रक्कम मुळ मालक याना परत करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनी कोर्टाच्या आदेशाचे पालन करत रोख रक्कम २७,८६,०००/- रुपये फिर्यादी प्रशांत भिमराव माने (सातारा) यांच्या ताब्यात दिली. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी रत्नागिरी यांचे हस्ते ही रक्कम देण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, रत्नागिरी व रत्नागिरी शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनित चौधरी उपस्थित होते.