(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्याच्या पर्स चोरण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. महिन्याला एक-दोन अशा चोरीच्या घटना घडत आहेत. कधी पर्स खेचणे, झोपेचा फायदा घेऊन चोरी करणे असे अनेक प्रकार घडत आहे. रेल्वेतून प्रवास करताना झोपेत एका महिलेच्या डोक्याजवळ ठेवलेली हॅण्डबॅग चोरट्याने चोरून नेल्याची घटना ८ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ६ ते ७ वाजण्याच्या रत्नागिरी रेल्वेस्थानकादरम्यान घडली. या चोरीत सोन्याच्या दागिन्यांसह मोबाइल व रोख रक्कम असा १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला.
याप्रकरणी इंदुलेखा मेनॉन (५४) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार त्या कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या १२६१७ मंगलादीप एक्स्प्रेसमधून प्रवास करत होत्या. या प्रवासात आपल्याकडील हॅण्डबॅग डोक्याजवळ ठेवून त्या झोपल्या होत्या. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ही गाडी रत्नागिरी रेल्वेस्थानकाजवळ आल्यानंतर त्यांना जाग आली. त्यांनी डोक्याजवळ पाहिले असता त्यांना हॅण्डबॅग दिसली नाही. त्यांनी इतरत्र पाहिले असता बॅग कोठेच न सापडल्याने त्यांनी ग्रामीण पोलिस स्थानकात बॅग चोरीला गेल्याची फिर्याद दिली.
या बॅगेत ४० हजार रुपये किमतीचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ५० हजार रुपये किमतीच्या ३० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, ४० हजार रुपयांचा सॅमसंग कंपनीचा मोबाइल आणि १० हजार रुपयांची रोख रक्कम होती. सुमारे १ लाख ४० हजारांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी चोरट्याविरोधात ९ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.
गेल्या काही महिन्यांमध्ये रेल्वेतील चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांमधून चिंता व्यक्त होत आहे. हे काम ठराविकच लोकांकडून होत असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रेल्वे पोलीस व स्थानिक पोलिसांनी या चोरट्यांचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.