(रत्नागिरी)
रेफ्रिजरेशन अँन्ड एअरकंडिशनिंग टेक्निशियन असोशियन या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २९ जुलै २०२३ रोजी संस्थेचे सचिव जीवन जायगडे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. यावेळी गतवर्षातील संस्थेने केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच संस्थेतील सभासदांना रेफ्रिजरेशन अँन्ड एअरकंडिशनिंगबाबत विविध सेमिनारचे सेमिनार आयोजन करून लाभ देण्यात आला. संस्थेतील दोन टेक्निशियन यांना त्यांच्या आजारपणात विशेष निधी गोळा करून आर्थिक मदत करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत सार्वजनिक स्वच्छता मोहिम, पुरग्रस्त भागात विशेष निधी गोळा करून संस्थेने मदत केली आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान व व्यवसायात वृध्दी व्हावी यासाठी प्रत्येकाने प्रशिक्षित होण्याची गरज आहे यासाठी संस्था मदत करेल असे श्री नौशाद वाडकर यांनी आपल्या मनोगतात मत व्यक्त केले. रेफ्रिजरेशनमध्ये वापरले जाणारे गँसेस हे धोकादायक आहेत ते हाताळताना परिपूर्ण प्रशिक्षण घेऊनच हाताळावेत असे मत संस्थेचे उपाध्यक्ष समीर मुजावर यांनी व्यक्त केले. संस्थेच्या हितासाठी व उन्नतीसाठी जे जे उपक्रम आपल्याला अपेक्षित आहेत ते राबवण्यासाठी आपल्या सहकार्याने संस्था काम करेल असे संस्थेचे उपाध्यक्ष मुद्दस्सर ठाकूर यांनी आपले मत व्यक्त केले. श्रमिक कामगार योजना संस्थेच्या माध्यमातून राबवून सभासदांना लाभ मिळवून देण्यासाठी संस्था काम करेल असे मत इलियास खोपेकर व्यक्त केले. आपल्या सर्वांच्या एकजूटीने सभासदांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी संस्था प्रयत्न करेल यासाठी आपण एकजूटीने कार्य करण्यास कटिबद्ध राहू या असे मत संस्थेचे अध्यक्ष सुधीर वासावे यांनी केले.
या संस्थेचे कार्य जिल्हा मर्यादित असून आजच्या सर्वसाधारण सभेसाठी जिल्हातून आलेल्या नवीन सभासदांना सभासद बनवून घेण्यात आले. रेफ्रिजरेशन व्यवसायिक यांच्यासाठी जिल्हा स्तरावर काम करणारी ही एकमेव संस्था असून या संस्थेच्या कामाचे कौतुक जिल्ह्यातील सदस्यांकडून होत असून संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी सभासदांकडून सहकार्य राहील असे आश्वासन सभासदांनी संस्थेला दिले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंझूर झारी, मनिष शिंदे, संतोष पाडाळकर, रूपेश कोळवणकर, सुयोग शिवगण, साजिद काझी यांनी योगदान दिले असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव जीवन जायगडे यांनी केले.