रत्नागिरी : रुग्णाला बरे करण्याचे काम ईश्वर करतो, आम्ही फक्त निमित्तमात्र आहोत. आम्ही रुग्णाला बरे करण्यासाठी उपचार करतो. मी ईश्वराचे अधिष्ठान मानतो. तो एकच आहे, तोच सर्वांवर कार्य करतो, असे प्रतिपादन नाचणे, रत्नागिरी येथील अपेक्स हॉस्पीटलचे संचालक डॉ. सुशीलकुमार मुळ्ये यांनी केले.
डॉक्टस् डेनिमित्त ते बोलत होते. संगमेश्वर आणि लांजा येथे यशस्वी रुग्णालयांनंतर रत्नागिरीमध्ये अपेक्स हॉस्पीटल सुरू करणाऱ्या डॉ. मुळ्ये यांनी सांगितले की, कोरोना काळातले डॉक्टर्स धोका पत्करून काम करत आहेत. इफेक्टिव्ह डिसीस असल्यामुळे देशभरात अनेक डॉक्टर्स मृत्यूमुखी पडले आहेत. आम्हालाही कोरोना रुग्णाची वेदना कळते, कारण मला व कुटुंबियांना कोरोना होऊन गेला आहे. पूर्वी याच्या संसर्गाचा धोका कमी होता. परंतु आता धोका वाढलाय. त्यातही डॉक्टर्स जीव धोक्यात घालून काम करत आहेत. शासन निर्देशानुसार आमच्या रुग्णालयातही लेखापाल बिल करत आहेत. कोरोनाची औषधे महाग असल्याने आम्हाला मिळतात त्यात मार्जिन न ठेवता ती आम्ही रुग्णाला देतो. परंतु लॉकडाऊनमुळे रुग्णाकडे पैसे नसल्याने खर्च पाहून अनेक नातेवाइकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. मागील लाटेमध्ये अशा तक्रारी नव्हत्या.
अलीकडे डॉक्टरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, या प्रश्नावर डॉ. मुळ्ये म्हणाले की, डॉक्टरकी हा एक पेशा आहे. पैसे मिळवतो, पण त्यातून नवीन मशिनरी, अद्ययावत तंत्रज्ञान आणायचे असते. अनेक गोष्टी करायच्या असतात. वैद्यकीय पेशा म्हणजे १०० टक्के लोकसेवा ईश्वरसेवा आहे. डॉक्टरांसह परिचारिका, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारीही कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून सेवा करत आहेत. त्यांचेही योगदान महत्त्वाचे आहे.
महात्मा फुले योजना राबवण्यासाठी परवानगी द्या
डॉक्टर व रुग्णांमध्ये दरी असल्याचे वातावरण आहे, याबाबत तुम्ही काय सांगाल, यावर डॉ. सुशीलकुमार मुळ्ये म्हणाले की, काही वेळा जास्त दिवस रुग्णाला अॅडमिट करून ठेवावे लागते. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ रुग्णांना दिला पाहिजे. परंतु अॅपेक्स हॉस्पीटलला अजून ही योजना शासनाकडून मंजूर झालेली नाही. आम्ही प्रस्ताव पाठवून आता १० महिने झाले आहेत. ही योजना लागू झाली तर रुग्णांवर मोफत उपचार करता येतील. ही योजना शासनाने लवकर मंजूर करावी.
प्रथम वर्धापनदिनानिमित्त सवलत योजना
अॅपेक्स हॉस्पीटलने पहिल्या वर्धापनदिनानिमित्त कोविड रुग्णांसाठी मी योजना जाहीर केली आहे. सध्या अडचणीच्या काळात ना नफा ना तोटा या स्वरूपात विचार करून रुग्णालय चालवत आहे. ज्या कोविड रुग्णांसाठी ७ दिवसांचा खर्च फक्त ३९९९९ रुपयांत उपलब्ध केला आहे. या ऑफरमध्ये रुग्णांना लागणारे एचआरसीटी, एक्स रे, सीटी पॅन, लॅब टेस्ट व औषधने या ऑफरमध्ये समाविष्ट आहेत. ही ऑफर ४० वर्षांपर्यंतच्या रुग्णांसाठी व एचआरसीटी स्कोअर १० च्या आत असणाऱ्यांसाठी आहे. शिवाय दहा वर्षांखालील मुलांना कोविड असल्यास मोफत उपचार केले जातील. ही ऑफर २० ऑगस्टपर्यंत आहे, अशी माहिती डॉ. मुळ्ये यांनी दिली.
बदनामी करणाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार
अॅपेक्स हॉस्पीटलबद्दल सोशल मीडियातून गैरसमज पसरवले गेले. मुद्दाम बदनामी केली जात आहे. अपेक्सबाबत गेल्या वर्षी कोणतेही गैरसमज नव्हते. खर्च जास्त होतो, असे बोलले जात होते. परंतु त्या वेळी औषधेही महागडी होती. आता औषधांच्या किंमती कमी झाल्या आहेत. आम्ही रुग्णांना डिटेल बिल देतो, औषधांची माहिती देतोय. परंतु काही लोकांनी मुद्दामहून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. त्यांना माझ्याकडून काय हवे आहे, हे माहित नाही. रुग्णालयाविरोधात न्यायालयात तक्रार नाही. खोट्या बातम्या ज्यांनी दिल्या, त्यांच्याविरोधात मी स्वतः तक्रार पोलिसांमध्ये दिली आहे. त्यांच्याविरोधात कोणतीही अॅक्शन घेतली गेली नाही, तर मी न्यायालयात जाणार आहे.
लसीकरण महत्त्वाचे
तिसरी लाट येणार आहे. साथ नियंत्रणासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, पोषक आहार, व्हिटॅमिन सी, सॅनिटायझरचा वापर करावा. शासनाने परवानगी दिल्यानंतर बाजारात प्रचंड गर्दी करू नका, लस संरक्षण देणार असली तरी काळजी घ्या, असे आवाहन डॉ. मुळ्ये यांनी केले. जास्तीत जास्त जनतेने लसीकरण करून घ्या. दोनदा लस घेऊनही मृत्यू झाला आहे, असा माझ्याकडे रुग्ण नाही. त्यामुळे लसीकरणावर भर द्यावा. सरकारवर दबाव आणून लसीकरण करावे. खासगी रुग्णालयांत लसीकरण व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.