( खेड/ इक्बाल जमादार )
मदतकार्य, सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्यात रिलीफ फाउंडेशनचा नेहमी पुढाकार असतो. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे महान कार्य रिलीफ फाउंडेशन करीत आहे. रिलीफ फाउंडेशन चे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. आखाती देश कत्तारमध्ये राहून देखील उद्योजक अजीम धनसे यांना आपल्या मातृभूमी खेड विषयी अत्यंत तळमळ आहे, अशा शब्दात कोकणचे सुपुत्र दुबई मधील सुप्रसिद्ध उद्योगपती बशीरभाई हजवाणी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात खेड येथील रिलीफ फाउंडेशन च्या कार्याचा गौरव केला.
सामाजिक, शैक्षणिक, मदतकार्यात नेहमी पुढाकार घेणाऱ्या रिलीफ फाउंडेशन च्या वतीने रविवारी ३१ जुलै रोजी स.११ वा खेड शहरातील हाजी एस.एम मुकादम मुकादम हायस्कूल येथे खेड मधील विविध शाळांमधील दहावी बारावी मधील नुकतेच गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मुलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उद्योगपती बशीरभाई हजवाणी, महावितरण चे कार्यकारी अभियंता श्री.शिवतारे, रिलीफ फाउंडेशनचे प्रमुख, खेड चे माजी सभापती सिकंदर जसनाई, हनिफ घनसार, खालिद चोगले, बशीर हंमदूले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. जे.सी क्लब खेड, लायन्स क्लब खेड,दानिषता फाउंडेशन खेड यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला.
रिलीफ फाउंडेशन चे सामाजिक कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहचेल आणि सर्वत्र नावारूपास येईल, सर्व समाज बांधवांनी पुढाकार घेऊन समाज कार्यात सहभागी व्हायला पाहिजे. रिलीफच्या कामांना प्रोत्साहन दिले पाहिजे, रिलीफ फाउंडेशनच्या सर्व उपक्रमांना या पुढे आपले सदैव सहकार्य राहील. शिक्षणाची आवड असणाऱ्या गरीब, गरजवंत मुलानी आपल्याकडे संपर्क करावा त्यांनाही संपूर्ण सहकार्य मिळेल असे सांगून रिलीफ फाउंडेशन च्या सर्व कामांना अल्ला ताला जझाया खेंर देवो* अशा शब्दात बशीरभाई हजवाणी यांनी शुभेच्छा दिल्या.
महापुर, कोरोना संकट अशा कोकणात प्रत्येक वेळी आलेल्या संकट काळात मदतकार्य करून रिलीफ फाउंडेशनने देवदूताची भूमिका बजावली आहे. गरजवंत लोकांना त्यांच्या अडलेल्या कामात मदत करणे, शिक्षणाची आवड आहे पण पैसे नाहीत अशा मुलांना मदत करणे अशी प्रमुख कामे रिलीफ फाउंडेशन च्या माध्यमातून उद्योजक अजीम धनसे यांच्या मार्गदर्शनाखाली सिकंदर जसनाईक, हनिफ घनसार, खालिद चोगुले यांच्या पुढाकारातून सुरू असतात. जलाल कादिरी, आरिफ मुलाजी, वहाब सैन्, दोस्त महंमद चोगुले, गौस खतीब, अमोल दळवी, श्रीराज पटेल, वसीम तांबे, अबरार दांभिलकर, श्रीराज हजवाणी, अस्लम हजवाणी, अब्बास सय्यद आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रऊफ खतीब यांनी केले.
व्हॅनिटी व्हॅन खास आकर्षण :
दुबई मधील उद्योगपती बशीरभाई हजवाणी यांनी खास आणलेली Vanity van (Mercedes) व्हॅनिटी व्हॅन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या गाडीचे खास आकर्षण म्हणजे गाडीत आरामदायी सर्व सुविधा एकाच ठिकाणी आहेत. संपूर्ण अँटोमॅटिक सुविधा असकेली ही कार बसच्या आकाराची आहे. मोठ्या शहारत चित्रपट शूटिंग करीता मोठं मोठे सिने अभिनेते दूर दूर च्या शूटिंगला जातांना अशा व्हॅनिटी कारचा उपयोग करतात. बशीरभाई हजवाणी यांची ही गाडी या कार्यक्रमात खास आकर्षण ठरली होती.