[ राजापूर /प्रतिनिधी ]
बारसु- सोलगाव पंचक्रोशीत प्रस्तावित होऊ शकणाऱ्या प्रदूषणकारी रिफायनरी विरोधी आंदोलनाला दडपण्यासाठी आंदोलनात पुढाकार घेणाऱ्या ग्रामस्थांवर खोटे गुन्हे दाखल करून तडीपारीचा प्रस्ताव करण्याच्या निषेधार्थ २५ जानेवारी रोजी करण्यात येणारे धरणे आंदोलन प्रत्यक्ष तडीपारी होईपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. असा निर्णय शनिवारी ( 21 जानेवारी) वरिष्ठ पोलीस अधीकारी घटूकडे यांच्याबरोबर झालेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
दबावाखाली ग्रामस्थांवर दडपशाही
बारसु- सोलगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी प्रदूषणकारी रिफायनरी होऊ नये यासाठी संविधानिक अधिकाराने आजपर्यंत सर्व आंदोलन केली आहेत. मात्र राजापूर पोलीस निरीक्षक परबकर , उपविभागीय पोलीस अधिकारी वाघमारे यांनी गावांत येऊन कसलीही चौकशी न करता व बेकायदेशीर सर्वेक्षणाला अडविल्याबद्दल, खोटा – मनमानी करणारा अहवाल प्रांतांना सादर केला, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रांताधिकाऱ्यांनी ग्रामसभेच्या परवानगी शिवाय सर्वेक्षणाला येणार नाही असे वचन देऊनही ( तसे व्हिडिओ उपलब्ध आहेत) सर्वेक्षणाला RRPCL व एम आय डी सी ची पथके आली होती. ग्रामसभांचे रिफायनरी विरोधातील व सर्वेक्षण न करण्याबाबतचे ठराव आणि माहिती अधिकारात उघड झालेली कागदपत्र असूनही यंत्रणांच्या दबावाखाली ग्रामस्थांवर दडपशाही करण्यात येत असल्याचे सांगितले.
कुणाची सामंतशाही चालणार नाही, आंदोलकांचा इशारा
जर तडीपारी घोषित करण्यात आली तर सर्वच पंचक्रोशी , राजापूर तालुका, मुंबईकर व समस्त कोकणवासी या अन्यायाविरुद्ध तहसील कार्यालय राजापूर येथे बेमुदत धरणे आंदोलन करतील. यात खोटा अहवाल बनविणाऱ्या राजापूर पोलीस स्थानकाचे परबकर, उपविभागीय पोलीस अधिकारी वाघमारे व रिफायनरी कंपनीची कायम बाजू घेणाऱ्या व ग्रामस्थांशी कायम आठमुठ्या वागणाऱ्या प्रांत वैशाली माने यांच्या निलंबनाची मागणीही प्रामुख्याने असेल. एकदा तडीपारी करून काय होते हे, प्रशासनाने बघावेच असे आव्हान संघटनेतर्फे केले गेले आहे. ग्रामस्थ निकराची लढाई लढून जिंकण्यास समर्थ आहेत, कुणाची सामंतशाही इथे चालणार नाही, असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला आहे.
यावेळी बारसु – सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे, सचिव सतीश बाणे, उपाध्यक्ष कमलाकर गुरव, खजिनदार दीपक जोशी, सरचिटणीस (मुंबई) नरेंद्र जोशी अध्यक्ष( मुंबई) वैभव कोळवणकर आदी उपस्थित होते.