”विकासाचा मारेकरी ठरलेल्या शिवसेनेचा त्याग करून राजा काजवे, पंढरीनाथ आंबेरकर यांसह शेकडो शिवसैनिकांनी भाजपामध्ये केलेला प्रवेश हा भविष्यातील शिवसेनेच्या राजकीय कारकिर्दीच्या शेवटाची सुरवात आहे, असा घणाघात भाजपाचे प्रदेश चिटणीस, रत्नागिरी जिल्हा प्रभारी व माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला. या वेळी त्यांनी कोकणच्याच नव्हे तर देशाच्या विकासाला गती देणारा रिफायनरी प्रकल्प होणारच आणि तोही नाणार परिसरामध्ये, अशी गर्जनाही केली.
शहरातील राजापूर हायस्कूलच्या कलामंदिर सभागृहामध्ये शेकडो शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी झालेल्या कार्यक्रमात जठार बोलत होते. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, लांजा तालुकाध्यक्ष मुन्ना खामकर, देवगड तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली, जिल्हा सरचिटणीस यशवंत वाकडे उपस्थित होते.