(लातूर)
अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्या मालकीच्या कंपनीला लातूरमध्ये देण्यात आलेल्या भूखंडप्रकरणी चौकशी सुरू होती. या प्रकरणी सहकार विभागाचा अहवाल आला असून रितेश आणि जेनेलिया देशमुख यांना सहकार विभागाकडून क्लीनचिट मिळाली आहे.
एमआयडीसीचे सीईओ बीपीन शर्मा या प्रकरणाची चौकशी करत होते. लातूर एमआयडीसीमध्ये रितेश आणि जेनेलिया यांच्या देश अॅग्रो प्रा. लि. कंपनीला महिन्याभराच्या आतच १२० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आल्याचा आरोप स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी केला होता. रितेश आणि जेनेलियाच्या ‘देश अॅग्रो’ या कंपनीवर लातूर भाजपाने आक्षेप घेतले होते. भाजपाने १९ ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेत प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी मागणी केली होती.
यानंतर लातूर एमआयडीसीच्या भूखंड चौकशी अहवालात जिल्हा उपनिबंधकांनी तीन सदस्यांची चौकशी समिती नेमली होती. त्रिसदस्यीय समितीच्या अहवालावर आधारित रिपोर्ट देण्यात आला आहे. भाजपच्या मागणीप्रमाणे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्या देश अॅग्रो कंपनीची चौकशी पूर्ण झाली आहे. चौकशीदरम्यान कंपनीशी संबंधित कोणतेही अनियमितता आढळून आली नाही.