(रत्नागिरी)
सर्व देशघटकांचा सर्वांगिण विकास व्हावा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ब्रीद आहे. त्यामुळे राष्ट्रीय सेवा समितीच्या माध्यमातून विविध विकास प्रकल्प राबवले जात आहेत. अनेक निस्वार्थी कार्यकर्ते, स्वयंसेवक पडद्यामागे उभे राहून कार्य करत आहेत. त्यांचे कौतुक केले पाहिजे. रत्नागिरीत विद्यार्थिनी वसतीगृह उभे राहण्यासाठीही अनेकांनी योगदान दिले आहे. या वसतीगृहात शिकणाऱ्या विद्यार्थिनी राष्ट्रभक्त व्हाव्यात, अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठलराव कांबळे यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय सेवा समितीच्या विद्यार्थिनी वसतिगृहाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन आणि नामकरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. सन्मित्रनगर येथील संस्थेने नवीन वास्तू उभारली आहे. या वसतीगृहाचे नाव कै. सौ. विमलताई वसंतराव पित्रे वसतिगृह असे केले आहे. तसेच या पूर्ण संकुलास कै. लक्ष्मण तथा बंडोपंत लिमये संकुल असे नाव दिले आहे. या दोन्ही पाट्यांचे अनावरण देणगीदार पित्रे व लिमये कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर देणगीदार प्रमुख अतिथी म्हणून पित्रे फाउंडेशनचे अध्यक्ष अजय पित्रे, देणगीदार विठ्ठल लिमये, नगर संघचालक वैद्य महेंद्र पाध्ये, राष्ट्रीय सेवा समितीचे अध्यक्ष संतोष पावरी, विद्यार्थिनी वसतीगृह समिती सदस्य सौ. नेहा जोशी आदी उपस्थित होते.
श्री. पित्रे यांनी सांगितले की, आईची आठवण काढण्यासाठी वास्तूची आवश्यकता नाही. परंतु आई-वडिलांनी ज्या प्रेरणेतून सामाजिक कार्य उभे केले. तशी प्रेरणा या विद्यार्थिनींना मिळावी. त्यांनीसुद्धा अशा प्रकारचे राष्ट्रकार्य करावे. रा. स्व. संघाचे संस्कार झाल्यामुळेच त्यांनी पित्रे फाउंडेशन सुरू केले. आज या वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी आई-वडिलांची खूप आठवण येत आहे. या वेळी इमारतीचे आर्किटेक्ट श्री. ढोल्ये, ठेकेदार मुकुंद जोशी आणि नागेश रायपनोर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
प्रास्ताविकामध्ये संतोष पावरी यांनी राष्ट्रीय सेवा समितीच्या कार्याची माहिती दिली. तसेच वर्षभराच्या आत दिमाखदार वास्तू उभी राहिल्याचे श्रेय सर्व देणगीदार, आपुलकीने मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांना दिले. या इमारतीमध्ये ५४ विद्यार्थिनींची राहण्याची व्यवस्था होणार आहे. यातून महिला सक्षमीकरणाला मदत होईल. समिती यापुढेही सामाजिक कार्य चालू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुरवातीला अलका भावे यांनी गीत सादर केले. कोषाध्यक्ष अॅड. प्रशांत पाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. सचिव अनिरुद्ध लिमये यांनी आभार मानले.