( रत्नागिरी / प्रतिनिधी )
उदयपूर-राजस्थान येथे नुकत्याच पार पडलेल्या योनेक्स सन राईझ मास्टर्स रँकिंग या बॅडमिंटन स्पर्धेत रत्नागिरीच्या सरोज सावंत यांनी चमकदार कामगिरी केल़ी. 55 वर्षांवरील महिला दुहेरी व मिश्र दुहेरी गटात सावंत यांनी रौप्यपदक पटकावले.
महिला दुहेरीत उपांत्य फेरीत सरोज सावंत व संगीता राजगोपालन यांनी टेसी जोसेफ-ज्योती सोमेह या जोडीचा 21-13 व 21-17 अशा दोन सेटमध्ये पराभव केला. अंतिम सामन्यात मंजुषा सहस्त्रबुद्धे व सुझान यांच्याशी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात 21-17, 20-22, 21-18 अशी निसटती हार पत्करावी लागली. तर मिश्र दुहेरीत कमलाकर राव यांच्यासोबत विक्रम भसीन व अमृत कोहली या जोडीचा 21-19, 21-19 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. मात्र अंतिम सामन्यात प्रभू नायडू व सुझान यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. सावंत याना दोन्ही गटात रौप्यपदक देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या राष्ट्रीय पातळीवरील यशाबद्दल पालकमंत्री उदय सामंत, प्रसन्न आंबुलकर, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर व जिल्हा असोसिएशनचे पदाधिकारी व क्रीडाप्रेमी यांनी अभिनंदन केल़े