(वर्धा)
विदर्भातील वर्धामध्ये होत असलेल्या ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा रविवारी अखेरचा दिवस होता. साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थितांना संबोधित करत साहित्यिकांना परखडपणे विचार मांडण्याचं आवाहन केलं आहे. राष्ट्रहितासाठी साहित्यिकांनी निर्भिडपणे आणि परखडपणे विचार मांडायला हवेत, मतभेद व्हायलाच हवे परंतु मनभेद होता कामा नये, परंतु साहित्यिकांनी रोखठोकपणे राष्ट्रहितासाठी विचार मांडण्याचं आवाहन साहित्यिकांनी केले आहे.
यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, आपल्या सर्वांच्या आयुष्यात साहित्याला मोठं महत्त्व आहे. साहित्यातूनच समाज बदलत असतो. शिक्षण, आरोग्य, उद्योग, विकास ही क्षेत्रं जशी महत्वाची आहेत तसंच साहित्य क्षेत्रदेखील महत्वाचं आहे. त्यामुळं देशहितासाठी साहित्यिकांनी निर्भिडपणे विचार मांडायला हवेत, असं गडकरी म्हणाले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नसल्यामुळं गडकरींनी दुःख व्यक्त केलं. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, सिंधुताई सपकाळ आणि पांडुरंग खानखोजे यांच्यासारखे लोक या भूमीत घडल्याचं गडकरी म्हणाले. महाराष्ट्रातील साहित्यिक आणि संत विचारांचा परिणाम समाजावर होत असतो. आदर्श व्यक्ती तयार करायचा असेल तर त्याचा संबंध संस्काराशी असायला हवा. संस्काराचा संबंध साहित्याशी असतो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात साहित्याचं मोठं योगदान असतं, असं गडकरी उपस्थितांशी बोलताना म्हणाले.