राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी अचानक अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याची घोषणा केल्याने राज्याच्या राजकारणात भूकंप झाला आहे. त्याचबरोबर यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचे शरद पवार यांनी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावर महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्ष तसेच भाजप आणि शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येत आहेत. मात्र, यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्रीपृथ्वीराज चव्हाण यांनी खळबळजनक विधान केले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी निपाणी येथील एका कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना केलेल्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय निश्चित आहे. काँग्रेसच्या मतांची विभागणीकरण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपकडून जेडीएसला मदत केली जात आहे. त्यातच काँग्रेसचा सहयोगी राष्ट्रवादीनेही कर्नाटकात काँग्रेसविरोधात उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादी अजून तरी आमच्यासोबत आहेत. परंतु आणखी किती दिवस आमच्यासोबत राहतील हे माहिती नाही. कारण भाजपासोबत त्यांची रोज बोलणी सुरू आहेत. कोणता नेता भाजपमध्ये जाणार याच्या रोज बातम्या येत आहेत. कोणी काय निर्णय घ्यावा तो त्यांचा अधिकार आहे,
राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जाही रद्द झाला आहे. त्यामुळे इतर राज्यात जाऊन मतांची टक्केवारी वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे, असे ते म्हणाले. त्यांना इतर राज्यात मतं मिळाली नाहीत. निवडणूक आयोगाने त्यांचा राष्ट्रीय दर्जा काढून टाकला आहे. त्यामुळे इतर राज्यात जावून मतांची टक्केवारी वाढली तर पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळवला जाऊ शकतो. भाजपची टक्केवारी वेगळी आहे आणि राष्ट्रवादीची टक्केवारी वेगळी आहे. त्याला तुम्ही फार गांभीर्याने घेऊ नका, अस पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.