(मुंबई / सुरेश सप्रे)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अजीत यशवंतराव यांना आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लांजा- राजापूर विधानसभा मतदारसंघात अधिक गतीने सक्रीय होत संघटन मजबूत करत कामाला लागा, असा आदेश अजित पवार यांनी दिला.
राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी पार पडली. त्यावेळी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, चिपळूणचे आमदार शेखर निकम, युवा नेते अजीत यशवंतराव उपस्थित होते. या बैठकीमध्ये अजितदादा पवार यांनी मतदारसंघातील विविध विकासकामे, पक्ष संघटना व इतर प्रलंबित प्रश्न इत्यादी विषयांवर सखोल चर्चा केली. या चर्चेनंतर अजितदादा यांनी सदरचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतरी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले.
त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजापूर – लांजा विधानसभा मतदारसंघात अधिक जोमाने कामाला लागण्याचे आदेश यशवंतराव दिले आहेत. तसेच पक्ष संघटनेत देखील यशवंतराव यांना लवकरच नवीन जबाबदारी देण्यात येईल असे जाहीर केले आहे. या आदेशाने अजित यशवंतराव यांना विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.