(मुंबई)
शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. मात्र महाविकास आघाडीतील अस्थिरता पाहून राष्ट्रवादीतील ५१ आमदारांनी भाजपला पाठिंबा देण्याचे पत्र सहीनिशी पक्ष नेतृत्वाकडे सोपवले होते. मात्र शिंदेंनी डाव साधल्याने राष्ट्रवादी आमदारांची निराशा झाली होती, असा खळबळजनक खुलासा आता समोर आला आहे.
महाविकास आघाडीचं सरकार कोसळण्याच्या मार्गावर असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपसोबत सत्ता स्थापण्याचे प्रयत्न केले होते.राष्ट्रवादीच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील एकूण ५४ पैकी ५१ आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापनेसाठी युती करावी, असं पत्र शरद पवार यांना दिले होतं. राष्ट्रवादीचे नेतृत्व वेळेवर निर्णय घेण्यात अयशस्वी ठरलं, असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले, तेव्हा राष्ट्रवादीचा भाजपसोबत जाण्याचा प्लॅन होता, असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला. अजित पवारांच्या बंडातील शिलेदार म्हणून प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला. राज्यांत सत्ता संघर्षाला सुरुवात झाली, त्यावेळी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या सर्व आमदारांना घेऊन गुवाहाटीला पोहोचले होते. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षासोबत सत्ता स्थापन करण्याचा प्लॅन आखला होता. तसे पत्रदेखील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले होते. मात्र, त्यांनी लवकर निर्णय न घेतल्याने एकनाथ शिंदे यांनी परत येऊन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, असे पटेल यांनी सांगितले.
दरम्यान प्रफुल्ल पटेल यांच्या या गौप्यस्फोटाला जितेंद्र आव्हाड यांनीही दुजोरा दिला आहे. तसंच हे पत्र जयंत पाटील यांनी शरद पवारांकडे दिलं नसल्याचंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. ते म्हणाले कि, जयंत पाटील यांनी ते पत्र शरद पवारांना दिलं नाही, कारण पाटील यांना माहिती होतं की शरद पवारांना किती वाईट वाटेल. त्यावेळी शरद पवारांना एकटं सोडा, आपण जाऊया, असं काही आमदारांचं म्हणणं होतं. तेव्हा जयंत पाटील ढसाढसा रडले होते,असा दावाही आव्हाड यांनी केला आहे.