(मुंबई)
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे दोन्ही गट अजित पवार गट आणि शरद पवार गट हे या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका लढवणार नाहीत, निवडणूक चिन्हाबद्दलची लढाई केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू असताना दोन्ही गटांनी याबद्दलचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान अजित पवार गटाच्या वर्किंग कमिटीची लवकरच दिल्लीत बैठक होणार असून, निवडणूक चिन्ह लढाईच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत ही बैठक होणार आहे. या बैठकीची तारीख लवकरच निश्चित होईल, अशी माहिती आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांपैकी एका गटाने जरी या निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असता तर कायदेशीर पेच निर्माण झाला असता आणि त्यानंतर चिन्ह गोठवण्याची शक्यताही निर्माण झाली असती. त्यामुळे दोन्ही गटांनीही या निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या 9 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीच्या चिन्हाची पुढची सुनावणी होणार आहे. त्यामुळे एक प्रकारे चिन्हाबाबतचा पेच निर्माण झाला असता. त्यामुळे हा पेच दोन्ही गटांकडून टाळण्याचा प्रयत्न केला गेला. या पाच राज्यांमध्ये फारशी ताकद जरी नसली तरी एखादा तरी उमेदवार निवडून आला असता. पण दोन्ही गट या निवडणुका लढण्याबाबत उत्साही नाहीत.
देशात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत आणि पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. यामध्ये मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, राजस्थान आणि मिझोरम या पाच राज्यांचा समावेश आहे. मात्र, या पाचही राज्यांमध्ये राष्ट्रवादीचा तितकासा प्रभाव नाही. शिवाय राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगात सुरु आहे.