(खेड/ भरत निकम)
मागील निवडणूकीत राष्ट्रवादीचे सहदेव बेटकर यांनी ५३ हजार मते घेतली होती. या मतांच्या बळानूसार राष्ट्रवादी काँग्रेसने गुहागर विधानसभा मतदारसंघावर हक्क सांगितला असून जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
आगामी निवडणुकीची चाहूल लागताच इच्छूकांची बाहुगर्दी वाढत आहे. मतदार संघांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर या दोन्ही पक्षांकडून इच्छूकांची संख्या वाढत आहे. या मतदारसंघात कुणाला उमेदवारी मिळणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिलेली आहे. जिल्ह्यातील एकमेव आमदार शेखर निकम हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सहभागी होऊन भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांना खेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी पाठिंबा दिला होता.
मागच्या विधानसभा निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहिलेले भास्कर जाधव यांनी अचानकपणे शिवसेनेत प्रवेश केला आणि गुहागरमधून त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविली. तेव्हा सहदेव बेटकर हे सेनेतून निवडणूकीची तयारी करत होते. आमदार भास्कर जाधव यांनी सेनेत प्रवेश केल्यानंतर बेटकर यांची पंचायत झाली होती. त्यानंतर बाबाजी जाधव यांनी पुढाकार घेऊन त्यांना राष्ट्रवादीत घेतले आणि त्यांना उमेदवारी मिळवून दिली होती. आमदार भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर गुहागर मतदार संघातून राष्ट्रवादी संपली, असे वाटत होते. मात्र, सहदेव बेटकर यांनी जवळपास ५३ हजार मते घेतली. त्यावेळी आमदार भास्कर जाधव यांना ७६ हजार मते मिळाली होती. राष्ट्रवादीत नवखे असल्याने त्यांना मिळालेली मते कुणालाही अपेक्षित नव्हती.
या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असल्याने थोडी मेहनत घेतली तर आमदार भास्कर जाधव यांना आव्हान देणं सोपं आहे, असा अंदाज धरुन राष्ट्रवादीने आगामी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मतदारांची चाचपणी घेत असून तशी तयारीही सुरु झाली आहे. खासदार सुनील तटकरे हे बाबाजी जाधव यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याने आगामी काळात गुहागर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत रंगत येणार आहे.