(मुंबई)
देशाला पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती मिळाल्या असल्या तरीही देशातील आदिवासांची परवड सुरू आहे, अशा शब्दात आमदार कपिल पाटील यांनी खंत व्यक्त केली. अधिवेशाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला, त्यावेळी पाटील बोलत होते.
आदिवासी पाडे आणि दुर्गम भागात मूलभूत सोयीसुविधा पोहोचत नाहीत. पालघर जिल्ह्यातील मोखाड्यातील अतिदुर्गम बोटोशी गावातील मरकटवाडी इथे ही हृदयद्रावक घटनेचा दाखला पाटील यांनी यावेळी दिला. या गावात रस्ता नसल्याने वंदना बुधर या गर्भवती महिलेला आरोग्य सेवा मिळवण्यासाठी तीन किलोमीटर डोलीतून पायपीट करत दवाखाना गाठावा लागला. परंतु आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने तिला तिच्या जुळ्या बालकांचा मृत्यू डोळ्यादेखत पाहावा लागला असल्याचेही पाटील यांनी सांगितले. त्यामुळे मुर्मू या देशाच्या सर्वोच्च स्थानावर विराजमान झाल्यानंतर देशातील आदिवासींचे प्रश्न नक्कीच मार्गी लागतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
द्रौपदी मुर्मू यांचे दुख हे महाभारतातील द्रौपदीपेक्षाही अधिक आहे. आदिवासींची होणारी फरफट त्यांनी जवळून पाहिली आहे. त्यामुळे आता आदिवासींच्या शिष्यवृत्तीचे पैसे, शिक्षण, गर्भवती स्त्रियांच्या मृत्यूची दखलही मुर्मू घेतील, असेही पाटील यांनी शेवटी नमूद केले.