( मंडणगड )
मा.राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांचा 12 फेब्रुवारी 2022 रोजी होणाऱ्या आंबडवे गावाचे नियोजीत दौऱ्याचे तयारीला वेग आला आहे. दरम्यान रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी 5 फेब्रुवारी 2022 मंडणगड तालुक्याचा दौरा केला. त्यांचे दौऱ्याचे निमीत्ताने जिल्हा पोलीस दलासह सर्वच शासकीय यंत्रणांचे उच्चपदस्थ अधिकारी दौऱ्याचे पुर्वतयारीचे कामात व्यस्त झालेले दिसून आले आहे. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी शिरगाव येथील मैदानाला भेट दिली. या मैदानात चार पक्के डांबरीकरण केलेले हँलीपड़चे काम पुर्ण करण्यात आले आहे. मैदानातील विविध यंत्रणांचा जिल्हाधिकाऱ्यानी आढावा घेतला. यावेळी जिल्हातील महसुल यंत्रणा, सार्वजनीक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा परिषदचे विविध स्तरातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तयारी आढावा घेताना सर्व अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी म्हणाले की, राष्ट्रपतींचे दौऱ्याच्या निमीत्ताने त्यांचे दौऱ्याची उत्तम नियोजन कऱण्याची संधी प्रशासकीय यंत्रणेस प्राप्त झाली आहे. देशाच्या प्रमुखाची सेवा करण्याची संधी या निमीत्ताने उपलब्ध झाली आहे. सर्वानी आपली मानसिकता बदलून कामास लागा व दौरा यशस्वी करण्याच्या नियोजनात सहभागी व्हा. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आंबडवे गावासही भेट दिली. दरम्यान जिल्हा पोलीस दलाचे बॉम्ब शोधक पथक गेल्या चार दिवसापासून तालुक्यात दाखल झाले आहे. सुरक्षा यंत्रणा येथील परिस्थितीतीचा आढावा घेत असून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाय योजनांकरिता पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे.
शिरगाव येथील हँलीपडसह भिंगळोली येथील शासकीय निवासस्थानांची डागडुजी करण्यात आली आहे. शिरगाव येथून आंबडवे येथे जाण्यासाठी बावीस किलोमीटर इतके अंतर गाडीमार्गाने पार करावे लागणार आहे. याकरिता आंबडवे लोणंद हा राष्ट्रीय महामार्ग सुस्थितीत असावा याकरीता महामार्ग प्राधिकरणाने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे कामासही सुरुवात केली आहे. शिरगाव येथील हँलीकेप्टरचे तळावर स्वच्छता गृह, विज पाणी व इंटरनेटची उपलब्धता व्हावी याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले असून त्याकरिता यंत्रणा कामास लागली आहे. या पुढील काळात मंडणगडमध्ये दाखल होणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या वाढणार आहे. याचबरोबर 10, 11,12 फेब्रुवारी 2022 या तीन दिवसांचे कालवधीत भिंगळोली व मंडणगड बाजारपेठेतून राष्ट्रपतींच्या गाड्यांचा फौजफाट जाणार असल्याने व्यापाऱ्यांना या कालवधीत सुरक्षा व स्वच्छता यांच्या उपाय योजनाकडे लक्ष देण्याच्या सुचना पोलीस दलाकडून घेण्यात आल्या आहेत.
स्थानीक पोलीसांनी सर्व व्यापाऱ्यांना या संदर्भात सूचना दिल्या आहेत, याचबरोबर सार्वजनीक ठिकाणी गर्दी होणार आहे यासाठी काळजी घेण्यात येत आहे. दौऱ्याचे वेळी शिरगाव ते आंबडवे या रस्त्यावरील वाहतूक काही काळसाठी बंद ठेवण्याची शक्यता आहे. यामुळे रस्ता केवळ राष्ट्रपती व अधिकारी यांच्या गाड्यासाठीच खुला राहील त्यामुळे कोणताही अडथळा राहणार नाही.
दौऱ्यानिमीत्त विविध स्तरातील अधिकारी मंडणगड तालुक्यात दाखल होणार आहेत. या पार्श्वभुमीवर येथे येणाऱ्या अधिकाऱ्याची निवासाची व्यवस्था कोठे करायची असा प्रश्न आहे. शहरातील व तालुक्यातील ह़ॉटेल लॉ़ज व निवास व्यवस्था करणाऱ्या केंद्राकडे मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या अधिकाऱ्यांची निवासही सोय करण्याची क्षमता नाही. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा खाजगी बंगले शोधत असून दौऱ्याचे निमीत्ताने तालुक्यात दाखल होणाऱ्या दोन दिवस आधीपासून यथायोग्य सोय करणे ही प्रशासकीय यंत्रणेसमोरील मुख्य आव्हान राहणार आहे.