(संगमेश्वर)
देशाचे वंदनीय पंतप्रधान, राष्ट्रनेते श्री. नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस ‘सेवा पंधरवडा’ म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला जात आहे. भाजपा कार्यकर्ते व अनेक मोदीप्रेमी संस्था, संघटना विविध सामाजिक सेवा उपक्रमांच्या माध्यमातून मोदीजींना शुभेच्छा देत आहेत.
भाजपा संगमेश्वर व कोळंबे विद्या प्रसारक मंडळ, कोळंबे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २ ऑक्टोबर रोजी ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ सांगता समारोह आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश सचिव, श्री. प्रमोद जठार यांच्या शुभहस्ते होणार असून रत्नागिरी द. जिल्हाध्यक्ष श्री. दीपक पटवर्धन, संगमेश्वर तालुकाध्यक्ष श्री. प्रमोद अधटराव आणि गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्पाचे व्यवस्थापक चंद्रशेखर देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत.
पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या जीवनावरील चित्र प्रदर्शनीचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. यामधून कार्यकर्ता ते नेता असा मोदीजींचा प्रवास कसा झाला हे उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमादरम्यान ग्रंथ प्रदर्शन आयोजित केले आहे. यामध्ये महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्रीजी व मा. मोदीजी यांच्या संदर्भातील अनेक दुर्मिळ पुस्तके वाचकांना पहावयास मिळणार आहेत. या दोन्ही उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन कोळंबे विद्या प्रसारक मंडळ, कोळंबेचे अध्यक्ष श्री. नयन मुळ्ये यांनी केले आहे.
या कार्यक्रमात श्री. जठार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी वसतिगृहातील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी आवश्यक असणारे स्वच्छता साहित्य वितरित केले जाणार आहे. या कार्यक्रमाद्वारे महात्मा गांधी व द्वितीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना मानवंदना देण्यात येणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन भाजपा कार्यकर्ते, ज्येष्ठ समाजसेवक श्री. अनिल घोसाळकर तसेच सर्व भाजपा कार्यकर्ते व अध्यक्ष, कोळंबे विद्या प्रसारक मंडळ, कोळंबे यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.