[ नवी दिल्ली ]
२२ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरूवात थाटामाटात झाली. या स्पर्धेच्या सुरूवातीलाच भारतीय खेळाडूंनी चांगली सुरूवात केली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अर्धशतक झळकावले आहे. विशेष म्हणजे हरमनप्रीत कौर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अर्धशतक झळकावणारी पहिली खेळाडू ठरली आहे.तब्बल २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. या स्पर्धेत हरमनप्रीत कौरने अर्धशतक झळकावणाऱ्या पहिल्या खेळाडूचा मान पटकावला आहे. तसेच, शेफाली वर्माने ४८ धावांची खेळी केली.
ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक एलिसा हिली हिने या सामन्यात मोठा विक्रम केला. एलिसाने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये यष्टिंमागे १०० बळी टिपण्याचा पराक्रम करत भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला. या फॉरमॅटमध्ये १०० बळी घेणारी ती पहिली खेळाडू ठरली.
दरम्यान, भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मानधना (२४) व शेफाली यांनी चांगली सुरूवात करून दिली. मात्र, डार्सिए ब्राऊनने ही जोडी तोडली. जेमिमान रॉड्रिक्सही ११ धावा करून बाद झाली. शेफाली ३३ चेंडूंत ९ चौकारांसह ४८ धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार हरमनप्रीतने मोर्चा सांभाळला आणि इतिहास घडवला. हरमनप्रीतने ३४ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ५२ धावा केल्या. मिगन शटने तिची विकेट घेतली. भारताने ८ बाद १५४ धावा केल्या.