(पाचल /वार्ताहर)
जवळपास बारा गावांसाठी उपलब्ध असलेले ग्रामीण रुग्णालय रायपाटण या रुग्णालयाबाबत अनेक समस्या रुग्णांकडून, ग्रामस्थांकडून ऐकायला मिळत आहेत. कधी डॉक्टर उपलब्ध नसतात तर कधी इतर सुविधा उपलब्ध नसतात, तर काही दिवसापासून रुग्णालयाला पाणीपुरवठा करणारा पंप बंद असल्याने कित्येक दिवस रुग्णांचे पाण्यावाचून हाल देखील होतं आहेत. त्यातच काल एका नवीन समस्येला रुग्णांना सामोरे जावं लागलं.
जवळपास दोन लाख चाळीस हजाराच्या आसपास वीज बिल न भरल्याने विद्युत वितरण कंपनीने ग्रामीण रुग्णालय रायपाटण चे वीज कनेक्शन कट केल्याने परिसरातील पाचल, कारवली, तळवडे, रायपाटण, या गावातील रुग्णालयात ऍडमिट केलेल्या रुग्णांचे हाल झाले होते.
याबाबत रुग्णालयात उपलब्ध असलेल्या डॉक्टर पंदरकर यांच्याशी संपर्क साधला असता, सदर रुग्णालयाच्या क्लार्क म्हणून कार्यरत असलेल्या महिला आठवड्यातून दोन दिवस रुग्णालयात कामकाजासाठी येतात व इतर दिवशी जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने सदर रुग्णालयातील कामकाज अपुरे राहते. त्यामुळे सदर वीज बिल काढण्यासाठी विलंब झाला असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. तर सिव्हिल सर्जन श्रीमती फुले मॅडम यांच्याशी संपर्क साधला असता कोव्हीड कालावधीत रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट जॉईंट केला आहे. ज्याचा सध्या रुग्णालयाला कसलाच उपगोग नसतो. परंतु त्याचे वीज बिलं रुग्णालयाशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे इतकं भरमसाठ बिलं आल्याचं सांगण्यात आलं. शेवटी सकाळी अकराच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय रायपाटण चे कट केलेलं वीज कनेक्शन रात्री पावणे दहा वाजता, सोमवारी वीज बिलं भरण्यात येईल असा रत्नागिरी चे कार्यकारी अभियंता यांचा कॉल आल्याने वीज कनेक्शन जोडण्यात आल्याचे विद्युत वितरण कंपनीचे पाचल शाखा अभियंता श्री बनगर यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.