(नवी दिल्ली)
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केलेला ‘इसिस’चा दहशतवादी शाहनवाज याने चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. अयोध्येतील राम मंदिरावर मोठा हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट होता, असे त्याने चौकशीत सांगितले आहे. या दहशतवाद्यांचा हस्तक हा भारतातून पाकिस्तानात पळून गेलेला फरहतुल्लाह घोरी असल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले. अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून ज्या हल्ल्यांची तयारी सुरू होती, त्याचा तोच ‘मास्टरमाईंड’ही आहे. घोरी हाच ‘इसिस’च्या नावाखाली ऑनलाईन जिहादसाठी तरुणांना तयार करीत होता.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने शाहनवाज याच्यासह तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. आता त्यांच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशीत दहशतवाद्यांचा एक धक्कादायक कटही समोर आला.
अयोध्येतील राम मंदिरावर मोठा हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. तसेच दिल्लीतील अक्षरधाम मंदिर, गजबजलेल्या बाजारपेठा, रेल्वे स्थानके या दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर होती. तसेच भाजप व आरएसएसचे बडे नेतेही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते. शाहनवाज या दहशतवाद्याने चौकशीत सांगितले की, त्यांचा हस्तक दुसरा तिसरा कुणी नसून तो भारतातून पाकिस्तानात पळालेला फरहतुल्लाह घोरी हा आहे.
गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावर 2002 मध्ये झालेल्या हल्ल्यात फरहतुल्लाह घोरी याचा समावेश होता. 2002 मध्येच हैदराबादच्या एसटीएफ ऑफिसवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याचा कटही घोरी यानेच रचला होता. घोरी हा मूळचा हैदराबादचाच रहिवासी असून त्याने भारतातून पळून जाऊन पाकिस्तानात आश्रय घेतला आहे. भारत सरकारने त्याला दहशतवादी घोषित केलेले आहे.