(मुंबई)
“माझ्यावर गद्दारीचा संशय घेणारे रामदास कदम यांनी मालाड विधानसभा निवडणुकीत मला तसेच लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांना पाडण्यासाठी भरपूर प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांच्या तोंडी गद्दारीची भाषा हास्यास्पद आहे,” अशी टीका खासदार गजानन कीर्तिकर यांनी केली आहे.
गजानन कीर्तिकर यांच्याबद्दल कदम यांनी संशय व्यक्त केला होता. त्या पार्श्वभूमीवर कीर्तिकर यांनी हे वक्तव्य केले. कीर्तिकर म्हणाले की, रामदास कदम यांचा गद्दारीचा इतिहास फार मोठा आहे. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत मालाड मतदारसंघातून मला पाडण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. नंतर खेड ते पुणे प्रवासात शरद पवार यांच्या गाडीत बसून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत चर्चा करीत होते. २०१४ च्या लोकसभेला अनंत गीते यांना पाडण्यासाठीही कदम यांनी प्रयत्न केले. कदम यांचा मुलगा सिद्धेश कदम याला लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा झाली आहे. त्यामुळे ते खोट्या बातम्या प्रसिद्ध करून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप कीर्तिकर यांनी केला.