(जीवन साधना)
रामायण आणि महाभारत या दोन घटना कालातीत आहे. म्हणजे या घटनेवेळी सांगण्यात आलेले तत्त्वज्ञान, कर्ममार्ग, धर्ममार्ग, भक्तिमार्ग आजच्या काळातही तंतोतंत लागू पडताना दिसतात. बालपणापासून श्रीकृष्णाने आपल्या लीलांमधून समाजाला आश्चर्यचकीत तर केलेच, शिवाय योग्य शिकवणही दिली. श्रीकृष्ण जसा भगवद्गीतेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, तसाच तो राधेशिवायही पूर्ण होऊ शकत नाही. राधा आणि कृष्ण यांची प्रेमकथा सर्वांना माहिती आहे. श्रीकृष्णाचे राधेवर जेवढे प्रेम होते, तेवढेच बासरीवरही होते. श्रीकृष्ण आणि राधा यांमध्ये बासरी दुवा होती, असे म्हटले जाते. मात्र, एका घटनेनंतर श्रीकृष्णाने बासरी वाजवली नाही अशी मान्यता आहे.
राधा-कृष्ण अपार प्रेमाचे प्रतीक मानले जातात. म्हणूनच आज हजारो वर्षांनंतरही दोघांचे एकत्र नाव घेतले जाते. उत्कट आणि नि:स्वार्थी प्रेम म्हणून त्यांचे दाखले दिले जातात. अतूट प्रेम असूनही राधा-कृष्णाचा विवाह होऊ शकला नव्हता. यामुळे जे प्रश्न प्रत्येक भक्ताच्या मनात उठतात, ते म्हणजे श्रीकृष्ण वृंदावनमध्ये गेल्यावर देवी राधाचे काय झाले? त्यांचे आयुष्य कसे गेले? आणि नेमका कसा त्यांचा मृत्यू झाला?
देवी राधाच्या मृत्यूशी संबंधित एक कथा ग्रंथांमध्ये आढळते. यानुसार राधाच्या मृत्युसमयी श्रीकृष्ण त्यांच्याजवळ उपस्थित होते. राधाने देह त्यागल्यावर श्रीकृष्णाने आपली बासरी तोडली होती आणि पुन्हा कधीही बासरी न वाजवण्याचा प्रण घेतला होता. मग नेमक्या कोणत्या परिस्थितीत देवी राधाचा मृत्यू झाला होता आणि श्रीकृष्णाने आपली बासरी का तोडली?
ग्रंथांनुसार, राधा-कृष्णाचे बालपण एकत्र गेले. त्यादरम्यान दोघांना प्रेमाची अनुभूती झाली आणि त्यांच्या अतूट नाते बनले. एक वेळ अशी आली, जेव्हा राधा-कृष्ण यांना एकमेकांपासून दूर व्हावे लागले. तो प्रसंग म्हणजे कंसाचा वध करण्यासाठी श्रीकृष्णाला जेव्हा मथुरेला जावे लागले. श्रीकृष्णाने तेव्हा लवकरच परतण्याचे वचन दिले होते.
देवी राधाने खूप दिवस श्रीकृष्ण परतण्याची वाट पाहिली. परंतु परिस्थितीमुळे त्यांना येता आले नाही. असे सांगतात की, काही काळानंतर देवी राधाचा विवाह एका यादवाशी झाला. विवाहानंतर देवी राधाने आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या, परंतु मनातल्या मनातच त्या श्रीकृष्णावर प्रेम करत होत्या. श्रीकृष्णाबद्दल त्यांचे प्रेम तसूभरही कमी झाले नाही.
दुसरीकडे, भगवान श्रीकृष्णाचा विवाहसुद्धा देवी रुक्मिणीशी झाला. राधाप्रमाणेच रुक्मिणीही श्रीकृष्णावर प्रेम करायच्या आणि त्यांच्याशी विवाह करण्यासाठी त्या आपला भाऊ रुक्मीविरुद्ध गेल्या. यामुळे श्रीकृष्णाने रुक्मिणीला पळवून आणून विवाह केला.
मथुरेत कंस वधानंतर श्रीकृष्णाने अनेक राक्षसांचा संहार केला. यादरम्यान महाभारत युद्धाचा काळही आला. आयुष्यभर विविध लीला करणारे श्रीकृष्ण द्वारकेत येऊन स्थिरावले. येथे कान्हाला द्वारकाधीश नावाने ओळखले जाऊ लागले.
श्रीकृष्ण आणि देवी राधाने पूर्ण आयुष्य आपापली कर्तव्ये पार पाडली. सर्व कर्तव्यांतून मुक्त झाल्यानंतर देवी राधाने पुन्हा श्रीकृष्णाला भेटण्याचा निश्यय केला. या तीव्र इच्छेमुळे त्या द्वारका नगरीत गेल्या. द्वारकेत गेल्यावर देवी राधाला श्रीकृष्णाच्या विवाहाबद्दल कळले, परंतु त्या दु:खी झाल्या नाहीत.
द्वारकेत श्रीकृष्णाशिवाय देवी राधाला कोणीही ओळखत नव्हते. श्रीकृष्णाने देवी राधाला पाहताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ते दोघेही खूप दिवस संकेतांद्वारे बोलत राहिले. कान्हासोबत जास्त वेळ घालवण्यासाठी त्यांनी महालात राहण्याची परवानगी मागितली. मग देविकेच्या रूपात त्या कृष्णमहालात राहू लागल्या.
देवी राधा महालात राहून तेथील जबाबदाऱ्या सांभाळू लागल्या. त्यांना जेव्हा संधी मिळायची, त्या श्रीकृष्णाचे मनोभावे पददर्शन घ्यायच्या. महालात श्रीकृष्णाजवळ राहूनही देवी राधाला कृष्णाशी आध्यात्मिक भावाची अनुभूती होत नव्हती. यामुळे त्यांनी महालापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून त्यांना पुन्हा एकदा उत्कट भक्तीची अनुभूती होईल.
देवी राधा द्वारकेतच दूर राहू लागल्या. काळाबरोबर देवी राधा अशक्त होऊ लागल्या. त्यांचा अंतिम काळ जवळ आला होता. अशा परिस्थितीत भगवान श्रीकृष्ण त्यांच्याजवळ पोहोचले. श्रीकृष्णाने देवी राधाची मनोकामना विचारली, जेणेकरून ती पूर्ण करता येईल.
तेव्हा देवी राधाने त्यांना शेवटची बासरी वाजवण्याचे सांगितले. राधाच्या अनुरोधावरून श्रीकृष्णाने बासरी वाजवणे सुरू केले आणि खूप मधुर धून कानी पडू लागली. कथेनुसार, श्रीकृष्णाने अनेक दिवसांपर्यंत सतत बासरी वाजवली आणि देवी राधाने बासरीची मधुर धून ऐकत-ऐकतच आपले शरीर त्यागले.
देवी राधाच्या मृत्यूनंतर श्रीकृष्णाच्या दु:खाला पारावर राहिला नाही. श्रीकृष्णाला माहिती होते की, त्यांची बासरी देवी राधाला खूप प्रिय होती. या बासरीची धून देवी राधाला सर्वात जास्त आवडायची. यामुळे देवी राधाच्या मृत्यूनंर त्यांनी आपली बासरी तोडून झुडपांत फेकून दिली आणि पुन्हा कधीही बासरी न वाजवण्याचा पण केला.
अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण आणि देवी राधाच्या प्रेमकहाणीची अखेर झाली. परंतु श्रीकृष्णाच्या स्वलोक गमनानंतर दोन्ही दिव्य शक्ती पुन्हा एक झाल्या, असा मतप्रवाह आणि मान्यता आहे.