(पुणे)
पुण्यात मनसेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष ॲड गणेश म्हस्के यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी लांडेवाडी येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पक्षात प्रवेश केला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून गणेश म्हस्के यांची ओळख आहे. मनसे पक्षाची स्थापना झाल्यापासून गणेश म्हस्के हे राज ठाकरेंसोबत होते. रविवारी अचानक त्यानी साथ सोडल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश म्हस्के हे मनसे पक्ष स्थापनेपासून राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. वाघोली शाखा संघटक पदापासून त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांना मनसेमध्ये विविध पदावर काम करण्याची संधी मिळाली. मात्र आता त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. लांडेवाडी येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत गणेश म्हस्के यांनी पक्षात प्रवेश केला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विपुल शितोळे, युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश सातव, वडगाव शेरी उपविभाग प्रमुख सचिन चव्हाण, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य अलंकार कांचन, मंगेश सातव, संदीप कांबिलकर, राहुल खैरे, शेखर पाटील, बंडू कर्डिले, शाखाप्रमुख सुदर्शन राठोड, तेजस पातकळ, रितेश निरपळ यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.