(मुंबई)
सुरुवातीला सदस्य व त्यानंतर अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर चर्चेत आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाची सरकारकडून पुनर्रचना करण्यात आली असून नवा अध्यक्ष तसेच अन्य तीन सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. शिंदे सरकारकडून राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी न्या. सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर तीन सदस्यांच्या रिक्त जागांवर ओमप्रकाश जाधव, मारुती शिंगारे आणि मच्छिंद्रनाथ तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी ४ डिसेंबर रोजी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारवर दबाव टाकल्याने सरकारी पातळीवर हालचालींना वेग आला होता. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी या समाज मागास असल्याचे सिद्ध होणे गरजेचे आहे. तसे सर्वेक्षण करण्याचे निर्देश राज्य सरकारकडून राज्य मागासवर्ग आयोगाला देण्यात आले होते. मात्र सरकारकडून कामात हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत दोन सदस्यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. तसे आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनीही नुकताच राजीनामा दिला होता. त्यानंतर आज विधीमंडळ अधिवेशनात हा मुद्दा गाजल्यानंतर राज्य सरकारकडून नव्या अध्यक्षांची नियुक्ती केली आहे.
आनद वसंत निरगुडे यांच्या राजीनाम्यानंतर मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष म्हणून सुनील बाळकृष्ण शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुनील शुक्रे यांनी गेली १० वर्षे मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले असून या वर्षी २४ ऑक्टोबरला ते सेवानिवृत्त झाले आहेत. तर काही दिवसांपूर्वी राजीनामा दिलेले आयोगाचे सदस्य संजीव सानावणे यांच्या जागी मच्छिंद्रनाथ मल्हारी तांबे यांची तसेच लक्ष्मण हाके यांच्या जागी सरकारने मारुती शिकारे यांची नियुक्ती केली आहे. मागास आयोगाचे आणखी एक सदस्य बालाजी किल्लारीकर यांनी सरकारवर कामात हस्तक्षेप करण्याचा आरोप करून आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी आता ओमप्रकाश शिवाजीराव जाधव यांची नियुक्ती केली आहे.