(मुंबई)
राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार डिसेंबरमध्ये नागपूर येथे होणार्या हिवाळी अधिवेशनापूर्वी करण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असले तरी हा विस्तार लांबणीवर पडणार असल्याची चर्चा भाजप आणि शिंदे गटात सुरू झाली आहे. त्यामुळे विस्ताराकडे डोळे लावून बसलेल्या आमदारांना आणखी वाट पाहावी लागणार आहे.
सरकार स्थापनेनंतर सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीच शपथ घेतली होती. त्यानंतर पहिल्या विस्तारात भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी नऊ मंत्र्यांना शपथ देण्यात आली. त्यामुळे सध्या २० जणांचे मंत्रिमंडळ राज्याचा कारभार हाकत आहेत.
नागपूर अधिवेशनापूर्वी या रिक्त जागा भरण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी दिले होते. मात्र, या विस्ताराबाबत भाजप आणि शिंदे गटात कोणतीही चर्चा झाली नाही. तशा कोणत्याही हालचालीही नाहीत. त्यामुळे हा विस्तार लांबणीवर पडतो की काय, अशी चर्चा भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्येही सुरू झाली आहे.