पतसंस्था चळवळीत येणाऱ्या अडचणी, प्रश्न, कायदा सुधारणा या संदर्भात चर्चा करून प्रस्ताव तयार करण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या थिंक टँकची बैठक पुणे सेंट्रल बिल्डिंग सहकार आयुक्त कार्यालयात पार पडली. या बैठकीला सर्व शासकीय तसेच अशासकीय सदस्य उपस्थित होते.
पतसंस्था चळवळ व्यापक पसरली आहे. ५०% जनता या चळवळीजवळ जोडलेली आहे. मात्र नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अधिक प्रभावी काम करण्याची गरज आहे. त्यासाठी थिंक टँकच्या बैठकीत सर्व सदस्यांनी आपला अनुभव पणाला लावून मौलिक योगदान करावे व भविष्यातल्या पतसंस्था चळवळीला दिशा दर्शक असे काम व्हावे अशी अपेक्षा डॉ. खंडागळे अप्पर आयुक्त यांनी व्यक्त केले.
पहिल्या बैठकीत कामकाजाची रुपरेषा निश्चित करण्यात आली. कायदा बदल, नियम बदल, पोटनियम बदल, कार्यपद्धतीतील सुधारणा अशा पद्धतीने वर्गीकरण करून महिन्यात किमान २ बैठका विषय निश्चित करून घेण्याबाबत एकमत झाले. सदस्यांनी सर्वकष असे टिपण तयार करून सादर करावे असेही अप्पर आयुक्तांनी सांगितले.
नव्याने अंतर्भूत झालेले १४४ कलम वसुली संदर्भातील अडचणी प्रलंबित प्रस्ताव कायद्यातील काही क्लिष्ट होत असलेल्या तरतुदी या संदर्भात बैठकीत चर्चा झाली.
वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावण्याची पद्धती तसेच सहकार कायद्यातील क्रियावान सभासद संकल्पना कलम ३२ नुसार उपलब्ध करून द्यायची माहिती या संदर्भात अनेक मुद्दे व सूचना या समितीचा सदस्य म्हणून आपण मांडल्याची माहिती ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.