देशातील लसीचा तुटवडा कमी करण्यासाठी केंद्राने वेगाने पावले टाकायला सुरुवात केली आहे. 16 ते 31 मे या पंधरवड्यात केंद्र सरकार अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एक कोटी 92 लाख डोस वितरित करणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रसार माध्यमांना दिली.
कोरोना लस विकसित करणाऱ्या यंत्रणेच्या विस्ताराबरोबरच लस तुटावड्याचा प्रश्नही यामुळे निकाली निघेल, असा विश्वास जावडेकर यांनी व्यक्त केला आहे. 16 मे पासूनच्या पंधरवड्यात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दोन कोटी कोरोना डोस पुरवण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने समोर ठेवले आहे. एखाद्या राज्याला किंवा केंद्रशासित प्रदेशाला किती डोस पुरवले जातील, याबाबत आगाऊ माहिती त्या राज्यांना किंवा केंद्रशासित प्रदेशांना दिली जाईल, असेही आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.
45 वयोगटाच्या पुढील नागरिकांसाठी डोस
प्रामुख्याने 45 वयोगटाच्या पुढील नागरिकांसाठी केंद्राकडून पाठविण्यात येणाऱ्या 191.99 लाख लसिंमध्ये कोव्हीशिल्डच्या 162.5 लाख आणि कोव्हॅक्सिन च्या 29.39 लाख लसी यांचा समावेश असेल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
केंद्राकडून मिळालेल्या लसी पूर्णपणे वापरण्यात याव्यात आणि त्यांची नासाडी टाळावी, अशा सूचना प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांना द्याव्यात, असेही केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात लसी वाया गेल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळेच खबरदारीच्या उपाययोजना म्हणून या सूचना करण्यात आल्या आहेत.