(मुंबई)
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्यात आता ७ हजार २३१ पदांची पोलीस भरती होणार आहे. राज्यात सन २०२० ची पोलीस शिपाई संवर्गातील ही ७२३१ रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली गेली आहे. पोलीस भरतीला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. पोलिस भरतीच्या प्रक्रियेत बदल करण्यात आला असून पहिल्यांदा शारिरीक चाचणी होणार आहे. तर मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
शिवसेनेतील बंडाळीनंतर राज्यात सत्तासंघर्ष निर्माण झाला आहे. मात्र या परिस्थितीतसुद्धा ठाकरे सरकारकडून अनेक निर्णय घेतले जात आहेत. यातच मंत्रिमंडळ बैठकीत पोलिस भरतीबाबत मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात ५ हजार पोलिसांची भरती झाली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील ७२३१ पोलिसांची भरती करण्यासाठी नियमांमध्ये बदलांची गरज होती. आता राज्याच्या पोलिस महासंचालकांना पोलिस भरती तातडीने सुरू करावी असे आदेश दिल्याचंही गृहमंत्र्यांनी सांगितले.
पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण ५० गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी १६०० मीटर धावणे (२० गुण), १०० मीटर धावणे (१५ गुण), गोळाफेक (१५ गुण) असे एकूण ५० गुण तर महिला उमेदवार ८०० मीटर धावणे (२० गुण). १०० मीटर धावणे (१५ गुण), गोळाफेक (१५ गुण) असे एकूण ५० गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठी शारीरिक चाचणी एकूण १०० गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी ५ कि.मी. धावणे (५०गुण), १०० मीटर धावणे (२५गुण), गोळाफेक (२५ गुण) असे एकूण १०० गुण असणार आहेत.
शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील, लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील. लेखी चाचणी मध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. परीक्षा मराठी भाषेत घेण्यात येईल. तसेच या लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. सदरहू पोलीस भरतीमधील लेखी परिक्षा विशेष बाब म्हणून OMR (Optical Mark Recognition) पध्दतीने घेण्याबाबत शासनाने मान्यता दिलो आहे.