(रत्नागिरी)
राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सर्व रस्ते उत्तम दर्जाचे झाले पाहिजेत, यासाठी दखल घेण्यात आली आहे. प्रत्येक यंत्रणेकडे हे रस्ते आहेत. बांधकामकडे 1 लाख कि.मी.चे रस्ते असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रत्नागिरीत भाजपाच्या विजयी संकल्प मेळाव्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेवेळी मंत्री चव्हाण बोलत होते. 2024 च्या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने विजयी संकल्प मेळावे घेतले जात आहेत. त्यासाठी भाजपातर्फे प्रत्येक मतदार संघात पक्ष बांधणी, घटक पक्ष बांधणीचा समन्वय येणाऱ्या काळात करणार आहे. त्यासाठी तयारी, सदस्य नोंदणी, बुथ सक्षमीकरणावर भर दिला जाणार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याच्या अडचणी समजून घेतल्या जाणार आहे. त्यातून महाराष्ट्र गेल्या निवडणुकीपेक्षा उजवा कसा होईल, यासाठी संकल्प केला जात असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
‘आनंदाचा शिधा’ वितरण व्यवस्थेंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वेळेत पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आतापर्यंत 1 कोटी 58 लाख शिधा जनतेपर्यंत पोहोचलेला आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.