(मुंबई)
राज्यात पावसाने दडी मारल्याने राज्यासमोर दुष्काळाचे संकट ओढवले आहे. तसे घडल्यास राज्यात शेतकरी आत्महत्येसारखे संकट गडद होण्याची भीती राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यात दुष्काळ जाहीर करुन त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना जाहीर कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात राज्यात शेतकरी आत्महत्येसारखे संकट उग्र होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. राज्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या 29 टक्के पाऊस ठराविक ठिकाणी झाला आहे. सद्यःस्थितीत 329 महसुली मंडळात पावसाचा 23 दिवसांचा खंड पडल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे. कोकण वगळता राज्यातील 18 जिल्ह्यातील खरीप वाया गेला आहे. सर्वांत कमी पावसाची नोंद सांगली जिल्ह्यात झाली आहे. तिथे सरासरीपेक्षा 45 टक्के कमी पाऊस झाला आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
राज्यातील बर्याचशा भागात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. कमी पावसामुळे खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. कोरडवाहू, जिरायती शेतीतील जवळपास 70 टक्के पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यात जमा आहे. शेतकऱ्यांनी पेरणी करीता, बियाणे-रासायनिक खते, औषधे यावर केलेल्या खर्चाचा परतावा परत मिळेल का नाही अशी शंका जयंत पाटील पत्रात उपस्थित केली आहे.
खरिपातील बहुतांश पिकांचे नुकसान झाले असून चारा पिकांचे देखील नुकसान झाले आहे. जनावरांच्या चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पशुधन वाचवण्याचे देखील मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पावसा अभावी सिंचनासाठी कालव्यांना आवर्तने सोडण्यासाठी धरणांत पुरेसा पाणी साठा उपलब्ध नाही. तसेच यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. एकंदरीतच राज्यात आगामी काळात दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, याकडे पाटील यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.