(चिपळूण)
तेलगी घोटाळ्याप्रमाणेच राज्यात सध्या १०० कोटींचा स्टॅम्प पेपर घोटाळा झाल्याचा आरोप करून आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार, जवळपास शंभर कोटींचे स्टॅम्प विकत घेतले गेले आणि बनावट प्रतिज्ञापत्रे करण्यात आली. याची चौकशी आता राज्य सरकारने सुरू केली आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. स्टॅम्प तेलगीसारखा हा स्टॅम्प घोटाळा नसला तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात हे स्टॅम्प कुणी खरेदी केले हे चौकशीत पुढे येणार आहे, असे ते म्हणाले.
ना. सामंत यांनी माजी मुख्यमंत्री उद्भव ठाकरे, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, नेते आ. भास्कर जाधव यांच्यावर तोंडसुख घेतले. ते म्हणाले की, मुंबईच्या निर्मलनगर पोलिस ठाण्यात ४ हजार ६८३ प्रतिज्ञापत्र बोगस सापडली आहेत. संबंधित पोलिसांनी प्रतिज्ञापत्र असणाऱ्या लोकांना दूरध्वनी केले व त्याची माहिती घेतली असता समोरच्या व्यक्तींनी याबाबत आपण कोणतेही प्रतिज्ञापत्र दिलेले नाही, अशी माहिती दिली. त्यामुळे ही बोगस प्रतिज्ञापत्रे असल्याचे पुढे आले आहे.
हा स्टॅम्प घोटाळा फक्त मुंबईपुरता मर्यादित नसून तो राज्यभर झाला असावा, अशी भूमिका आपण मांडली. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात हा स्टॅम्प घोटाळा पोहोचला आहे. कोल्हापुरातही मुंबईच्या विशेष पथकाकडून तपास सुरू आहे. पोलिस या घोटाळ्याची पाळेमुळे खणून काढतील, असे ना. उदय सामंत म्हणाले.