(मुंबई)
राज्यातील सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणून एसटीची ओळख आहे. प्रथम कोरोना व त्यानंतर कामगारांच्या विलनिकरणाच्या मागणीसाठी केलेल्या संपामुळे एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत म्हणून महामंडळ लवकरच राज्यात पहिल्या धुळे आणि यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येकी एक असे दोन पेट्रोलपंप सुरू करणार आहे. पूर्वी राज्यात ३० पेट्रोलपंप सुरू करण्याचा महामंडळाचा प्रस्ताव होता.
सध्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्पन्नाचे नवनवीन स्त्रोत शोधण्याचे महामंडळाने काम सुरू आहे. त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून काही वर्षांपूर्वी एस.टी.ने राज्यातील त्यांच्या मालकीच्या मोक्याचा ३० जागांवर प्रत्येकी एक याप्रमाणे ३० पेट्रोलपंप सुरू करण्याचे ठरवले होते. परंतु कोरोनामुळे हा प्रकल्प मागे पडला. कालांतराने करोनामुळे प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाल्यावर एसटीने मालवाहतुकीचाही उपक्रम सुरू केला. त्याला प्रतिसाद वाढत असतानाच कामगारांनी विविध मागण्यांसाठी संप केला. त्यामुळे प्रवासी व मालवाहतूक तब्बल साडेपाच ते सहा महिने जवळजवळ बंद होती. आता कामगार कामावर परतल्याने प्रवासी व मालवाहतूक पूर्वपदावर येत आहे. परंतु या काळात एसटीची आर्थिक स्थिती कोलमडलेली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी महामंडळाने पहिल्या टप्प्यात धुळे आणि यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येकी एक इंडियन ऑईल कंपनीचे पेट्रोलपंप सुरू करण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी आवश्यक प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे.
‘एसटी’ च्या पंपावर सध्या केवळ डिझेल आणि पेट्रोल उपलब्ध राहील. परंतु कालांतराने सीएनजीही उपलब्ध करण्याचा महामंडळाचा प्रयत्न असणार आहे. तेथे महामंडळाच्याच कर्मचाऱ्यांची सेवा घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे एस.टी.च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. “महामंडळाने धुळे आणि यवतमाळ जिल्ह्यात एसटीच्या जागेवर प्रत्येकी एक पेट्रोलपंप सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. कालांतराने इतरही भागात हा प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न आहे’’ असे शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ, मुंबई यांनी सांगितले.