(मुंबई)
प्रजासत्ताक दिन उद्या साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांनी वर्तवली आहे. त्यामुळे राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या 26 जानेवारीला देशातील कोणत्याही राज्यात किंवा मोठ्या शहरात दहशतवादी सर्वात मोठा हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
देशात G20 परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याने धोका आणखी वाढला आहे. लष्कर- ए- तैयबा, जैश- ए- मोहम्मद, आयसीसशी संबंधित संघटना अकीस, जमात- उल- मुजाहिद्दीन या संघटना हल्ले करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. तर, त्यांना नेहमीप्रमाणे पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयची साथ आहे, अशी माहिती समोर येत आहे.
देशातले बडे राजकीय नेते, सैन्यदल, पोलीस अधिकारी हे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहेत. आयईडी, ड्रोन यांद्वारे सैन्यदल, पोलिसांच्या वाहनांवर हल्ल्यांची शक्यता आहे. तसेच, परदेशी नागरिकांना लक्ष्य करुन G20 परिषदेत खोडा घालण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न आहे. हल्ला नेमका कशाप्रकारे होईल याची माहिती सुरक्षा यंत्रणा घेत आहेत.