कठोर निर्बंधांचे नागरिकांकडून होत असलेले पालन आणि जिल्हाबंदी याचे चांगले परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. राज्यातील कोरोनाचा उद्रेक आता बराच नियंत्रणात आला असून, चार दिवसांपूर्वी दररोज 60 हजारांवर बाधित आढळून येत असताना, रविवारी हा आकडा 49 हजारांच्या आणि आज सोमवारी 40 हजारांच्या खाली आला आहे. मागील चोवीस तासांत केवळ 37,326 बाधितांची नोंद झाली.
राज्याच्या आरोग्य विभागाने आज सायंकाळी याबाबतची माहिती जाहीर केली. यानुसार, राज्यात एका दिवसात 61,607 बाधितांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर याच काळात 549 लोकांचा मृत्यूही झाला. नवे बाधित आणि मृत्यूदर राज्यात आता कमी होत असल्याचे हे चित्र आहे. नव्या बाधितांची संख्या कमी होत असल्याने, राज्यातील सक्रिय बाधितांची संख्याही आता कमी होत आहे.
कठोर निर्बंध 31 मेपर्यंत वाढणार
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी सध्या लागू असलेल्या कठोर निर्बंधांची मुदत 31 मेपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बुधवारी होणार्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.
तिसर्या लाटेसाठी टास्क फोर्स : राजेश टोपे
दरम्यान, राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असली, तरी ती थोपविण्यासाठी सरकारने टास्क फोर्स अर्थात् कृती दलाची स्थापना केली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. दुसर्या लाटेत जे दुष्परिणाम दिसून आले, ते तिसर्या लाटेत दिसणार नाही, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.