(रत्नागिरी)
शालेय शिक्षण विभागांतर्गत ‘लेटस चेंज’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील २,१३० शाळेतील ६४,९६७ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. सहभागी झालेल्या शाळांमधून उत्तम कामगिरी करणाऱ्या टॉप शाळांमध्ये १०० शाळांची निवड करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत निवडण्यात आलेल्या टॉपच्या ३५ शाळांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दाेन शाळांचा समावेश आहे. गुहागर व खेड तालुक्यातील या शाळा आहेत.
शालेय शिक्षण विभागामार्फत ‘लेटस चेंज’ या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता मॉनिटर’ बनवण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील ३८ लाख विद्यार्थी आमूलाग्र बदल घडवून महाराष्ट्राला कचऱ्याबाबत काळजीमुक्त करणार आहेत. या उपक्रमांतर्गत उत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यातील लाखो शाळांमधून १०० टॉप शाळांची निवड करण्याचे शासनाने घोषित केले होते. शासनाने आत्तापर्यंत राज्यातील ३५ टॉप शाळांची निवड केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद कुडली शाळा क्रमांक ४ आणि खेड तालुक्यातील भडगाव येथील आर. डी. ज्ञानदीप विद्यामंदिर या शाळांचा समावेश आहे. लवकरच राज्यातील आणखी टॉपच्या ६५ शाळांची निवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी काही शाळांचा समावेश असेल, अशी आशा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
हे ‘स्वच्छता मॉनिटर’ कुठेही येताना-जाताना कोणी बेफिकीरपणे थुंकताना किंवा कचरा टाकताना दिसल्यास त्याच जागी त्या व्यक्तीला थांबवणार आणि झालेली चूक दर्शवून देत सुधारायला सांगण्याचे काम करणार आहेत. दोन महिन्यांच्या ‘लेटस चेंज’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांकडून एकदाही साफसफाई करून घ्यायची नाही. तसेच कोणत्याही प्रकारच्या चित्रकला, वक्तृत्व आदी स्पर्धा आयोजित करावयाच्या नाहीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.