(मुंबई)
राजकीय घडामोडींमुळे रखडलेल्या वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या बदल्यांचा मुहूर्त अखेर सोमवारी उशिरा निघाला. गृह विभागाने सायंकाळी जारी केलेल्या बदली आदेशात राज्यातील १०४ आयपीएस अधिका-यांच्या बदल्यांची ठिकाणे जाहीर केली. यात पोलिस उपायुक्त आणि पोलिस अधीक्षक स्तरावरीला अधिका-यांचा समावेश आहे. पालघरचे अप्पर पोलिस अधिक्षक प्रकाश गायकवाड यांची सोलापूर शहर पोलिस उपायुक्त पदी तर नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या पोलिस अधिक्षक दिपाली काळे यांची सोलापूर शहर पोलिस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
हिंगोलीतील अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांची परभणी अप्पर पोलिस अधिक्षकपदी बदली झाली. बारामतीचे अप्पर पोलिस अधिक्षक मिलींद मोहिते यांची हिंगोली अप्पर पोलिस अधिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. पुणे येथील पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांची हिंगोलीतील राज्य राखीव पोलिस बल (गट- १२) समादेशकपदी नियुक्ती झाली आहे.
नाशिकच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधिक्षक अजय देवरे यांची लातूरच्या अप्पर पोलिस अधिक्षकपदी बदली झाली. यवतमाळ येथील अप्पर पोलिस अधिक्षक खंडेराव धरणे यांची नांदेड जिह्यातील भोकर येथे अप्पर पोलिस अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. बिडचे नवे अप्पर पोलिस अधिक्षक म्हणून सचिन पांडकर यांची नियुक्ती झाली आहे. पांडकर हे पूर्वी मुंबई येथील महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे पोलिस अधिक्षक होते.
पोलिस अधिकारी प्रणय अशोक यांची मुंबईहून नवी मुंबईला तर मंजुनाथ शिंगे यांची सहायक पोलिस महानिरीक्षक म्हणून राज्य पोलिस महासंचालक कार्यलयात नियुक्ती करण्यात आली आहे. तर चर्चेत राहिलेले डीसीपी अकबर पठाण पुन्हा मुंबईत आले आहेत. पठाण आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्यासह सात जणांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ज्या अधिका-याची बदली झाली त्यांनी मिळालेल्या नव्या ठिकाणी तत्काळ रुजू व्हावे, असे आदेश गृह विभागाने दिले आहेत. राज्यात पोलिस भरतीची प्रक्रिया देखील येत्या काही दिवसांत सुरु होणार आहे. त्यामुळे बदली झालेले वरिष्ठ अधिकारी पुढील दोन ते तीन दिवसांत बदलीच्या ठिकाणी हजर होतील.
या खेरीज नव्याने बदली करण्यात आलेल्या पोलिस अधिका-यांमध्ये प्रियांका नारनवरे, भाग्यश्री नवटके, नम्रता जी. पाटील, राहुल उत्तम श्रीरामे, सागर पाटील, विवेक पाटील, तेजस्वी सातपुते, मनोज पाटील, स्वप्ना गोरे, राहूल माकणीकर, गजानन राजमाने यांच्यासह राज्यातील १०४ अधिका-यांचा समावेश आहे.