(रत्नागिरी/दादा जाधव)
जिल्ह्यासह राज्यातील सुमारे 94, 541 शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दिनांक 1 जून पासून सुरू होणार आहे. ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या या प्रशिक्षणासाठी जिल्ह्याचे नोडल ऑफिसर म्हणून डाएट प्राचार्य यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे तर्फे आयोजित करण्यात आलेले सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण हे एकूण 50 ते 60 तासांचे असणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या प्रशिक्षणामध्ये राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील नोंदणीकृत प्रशिक्षणार्थी सहभागी होणार आहेत.
दरम्यान नोंदणीपासून प्रमाणपत्र प्रदान प्रक्रिये पर्यंतच्या सर्वच बाबी ऑनलाइन असल्याने तसेच पावसाळा सुरु होत असल्याने मे महिनाभर प्रतिक्षेत असलेल्या प्रशिक्षणार्थीनी नाराजी व्यक्त केली आहे. असे असले तरी अनेक वर्षानंतर हे प्रशिक्षण होत असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र दुर्गम अशा रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील अनेक प्रशिक्षणार्थी या प्रशिक्षणापासून वंचित राहणार असल्याची चर्चा सुरू आहे. ऑनलाइन पद्धत नोंदणीमुळे काही प्रशिक्षणार्थींची दोन तसेच दोन पेक्षा अधिक वेळी नोंदणी झाली होती.त्यामुळे निर्माण झालेला गोंधळ कंत्राटदार कंपनीने पेलण्यात यश मिळविले. मात्र नव्याने फॉर्म भरण्यात तसेच ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्यासाठी प्रशिक्षण शुल्क भरण्याची सुविधा दुरूस्ती लिंक मध्ये नसल्याने अनेक प्रशिक्षणार्थी वंचित राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सदरचे प्रशिक्षण पहिल्यांदाच ऑनलाइन होत असून यावर प्रत्येकी सुमारे 2000 रुपये शुल्क आकारण्यात आलेले आहे ,असे शुल्क भरण्यास अनेक प्रशिक्षणार्थी तसेच अनेक शिक्षण तज्ञ, शिक्षक संघटना, निवृत्त प्रशासकीय अधिकारी यांनी विरोध दर्शविला होता. यावर भरवसा ठेवलेले व त्यामुळे शुल्क न भरलेले काही प्रशिक्षणार्थी अजुनही प्रतिक्षेत असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान पुढील काही दिवसात पुन्हा प्रशिक्षण सुरु होणार असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.