(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी जिल्हावासीयांचे अंतराळ पहाण्याच स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. राज्यातील ॲक्टिव थ्रीडी असलेले हे पहिलेच तारांगण रत्नागिरीत असून सुमारे ११ कोटी ५८ लाख रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आले आहेत. याचा शुभारंभ दि.१६ डिसेंबरला मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
रत्नागिरीकरांना चंद्राचा पृष्ठभाग कसा दिसतो याचे जवळून दर्शन घडेल आणि लघुग्रह कसे आदळतात याचाही अनुभव घेता येणार आहे. या तारांगणाला आलेले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण असे नाव देण्यात आले आहे.
भारत सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणातील मार्गदर्शक तत्वांना अनुसरून रत्नागिरी नगरपरिषदेने तारांगण आणि विज्ञान भवन (सायन्स पार्क) विकसित करण्यासाठी उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.या तारांगणातील आधुनिक उपकरणे मुंबईच्या इन्फोव्हिजन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड द्वारे पुरविली जात असून कार्यान्वितही केली जात आहेत.
विज्ञान आणि खगोलशास्त्राच्या लोकप्रियतेसाठी अथकपणे करण्यासाठी स्थापन झालेली वचनबद्ध संस्था म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करण्यात अभिमान बाळगणाऱ्या इन्फोव्हिजनने डिजिटल उत्पादनातील ॲक्टीव ३डी तारांगण क्षेत्रामधे जागतिक आघाडीवर असलेल्या अमेरिकेच्या इव्हान्स आणि सदरलँड कॉम्प्युटर कॉर्पोरेशनच्या सहकार्याने भारतात ५० हून अधिक अत्याधुनिक तारांगणांची स्थापना केली आहे. यामधे आशियातील पहिले डिजिटल तारांगण, मुंबई येथील नेहरू तारांगण, (२००३) आणि पिलिकुला मंगलोर (२०१८) येथील भारतातील पहिले ॲक्टिव्ह ३डी डिजिटल तारांगण स्वामी विवेकानंद तारांगण; यांचा समावेश आहे.