( मुंबई )
अंगणवाडी कर्मचारी महिलांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत राज्यातील एक लाख महिला अंगणवाडी कर्मचारी फेब्रुवारी महिन्यात संपावर जाणार आहेत.
कोरोना काळात अंगणवाडी सेविकांनी आरोग्य सेवा पुरवल्या होत्या. राज्य शासनाने आपले मानधन वाढवले, त्याला साडेपाच वर्षे उलटून गेली. केंद्र सरकारने पगारवाढ करुन साडेचार वर्षांचा काळ लोटला आहे. कोरोना हटवण्यासाठी दिवस रात्र कष्ट घेतले. पण त्याचे फळ काय मिळाले? असा प्रश्न अंगणवाडी महिला कामगारांकडून विचारला जात आहे. त्यामुळे त्यांनी आता टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 20 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्रभर काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे.
महागाई दुप्पटीने वाढली मात्र, मानधनात वाढ झाली नाही. अंगणवाड्यांच्या भाड्यात वाढ नाही, आहाराच्या दरात वाढ नाही, सेवा समाप्तीचा लाभ नाही, आजारपणाच्या रजा नाहीत, हक्काच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील नाहीत. वर्षभरापासून नवीन मोबाईलसाठी आंदोलन करुनही मोबाईल मिळालेला नाही, असा आरोप अंगणवाडी सेविकांनी केला आहे.
अंगणवाडी सेविका एकजुटीने राज्यांमध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये याबाबत बैठका घेत आहेत. यात त्यांनी राज्यभरासाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याची देण्यात आली आहे. २० फेब्रुवारी २०२३ पासून त्या बेमुदत संपावर जाणार आहेत. अंगणवाड्या बंद, सर्व कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे.
आता अम्ही घरात बसून राहणार नाही, रस्त्यावर उतरून लढणार आहोत. असा निर्धार अंगणवाडी सेविकांनी केला आहे. १ फेब्रुवारीला राज्य शासन, प्रशासनाला नोटीस बजावली जाईल. त्यानंतर सर्व जिल्हा परिषदा, प्रकल्प कार्यालयांना मोर्चा काढून नोटीस दिली जाईल. तसेच २० फेब्रुवारीपासून बेमुदत संप सुरु होईल अशी माहिती त्यांच्यातर्फे देण्यात आली आहे.