(मुंबई)
राज्यातील आमदारांचे पीए आणि वाहन चालकांचा पगार सरकारी तिजोरीतून करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता त्यांच्या पगारातही आणखी ५ हजार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शासन आदेशही जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या विद्यमान सदस्यांना त्यांच्या पदाची कामं अधिक चांगल्या पद्धतीने करता यावी यासाठी पीए देण्यात येतो. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आमदारांचे स्वीय सहाय्यक आणि वाहन चालकांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आमदारांच्या पीए ला ३० हजार तर वाहन चालकाला २० हजार रूपये पगार देण्याचे विधेयक मार्च २०२२ मध्ये विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले होते. आता या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा सरकारी आदेश काढण्यात आला आहे.
आमदारांच्या स्वीय सहायकाला दर महिना २५ हजार रुपये आणि वाहन चालकाला दर महिना १५ हजार रुपये वेतन यापूर्वी मिळत होते. त्यानंतर आता नवीन सरकारच्या काळात या स्वीय सहाय्यक ३० हजार आणि वाहनचालकांना आणखी पाच हजार रुपये वेतनवाढ देऊन त्यांची वेतन आता २० हजार रुपये करण्यात आले आहे. १ एप्रिल २०२२ पासून हे वेतन लागू करण्यात आल्याने स्वीय सहायक आणि वाहन चालकांना पगारातील एप्रिलपासूनची फरक रक्कमही मिळणार आहे.
राज्याच्या विधानसभेत एकूण २८८ तर विधानपरिषदेत ७८ आमदार आहेत. या सर्व आमदारांचे स्वीय सहायक आणि वाहन चालकांना या पगारवाढीचा लाभ मिळणार आहे.