(मुंबई)
राज्यातला खरा मुख्यमंत्री कोण, गद्दार की गद्दारी करायला लावणारा असा सणसणीत सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. हा सवाल करताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. बाबरी मशीद पाडण्याविषयी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भाजपविरोधात आक्रमक झाले आहेत.
बाबरी मशिदीचा ढाचा पडला, तेव्हा शिवसैनिक नव्हते, बाळासाहेब ठाकरे हेही अयोध्येत नव्हते. नंतर मी जबाबदारी घेतो असे म्हणाले, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी एका मुलाखतीदरम्यान केले. आदित्य ठाकरे यांनी भाजपवर तीव्र शब्दात टीका केली. ते म्हणाले, राजकारणातून ठाकरे परिवाराला भाजपला संपवायचे असल्याने हे असले प्रकार घडायला लागले आहेत.
भाजपाचा राग हा बाळासाहेब ठाकरें, ठाकरे परिवारावर आहे. बाळासाहेब ठाकरेंमुळे भाजपा महाराष्ट्रात मोठी झाली. आता तर गद्दारांकडून कोणतीच अपेक्षा नाही, हे असेच झुकलेले राहतील, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. अवकाळी पावसामुळे राज्यभरातील शेतीचे मोठं नुकसान झाले आहे. मात्र मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर फोटो काढायला जातात. आतापर्यंत ज्या घोषणा झाल्या त्यापैकी किती मदत मिळाली, हे एकदा जाणून घ्या, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे. यावेळीच राज्यातला खरा मुख्यमंत्री कोण, गद्दार की गद्दारी करायला लावणारा असा सणसणीत सवालही त्यांनी केला आहे.