(मुंबई)
राज्याचा सन २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प येत्या ९ मार्च रोजी विधिमंडळात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार आहेत. ३० जून २०२२ रोजी सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.
या अधिवेशनात ९ मार्चला दुपारी २ वाजता अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. तत्पूर्वी म्हणजे ८ मार्च रोजी महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल मांडला जाईल. सध्या राज्य मंत्रिमंडळाच्या रचनेत राज्यमंत्री नाहीत. त्यामुळे अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होऊन वित्त खात्यासाठी राज्यमंत्री नेमण्यात आला नाही तर विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विद्यमान मंत्र्यापैकी दीपक केसरकर, शंभूराज देसाई यांना प्राधिकृत केले जाऊ शकते.
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून मुंबई, ठाणे, नागपूर महापालिकेसह १५ महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांसाठी अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा असू शकतात. कृषी, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सिंचन, ऊर्जा विभागांना अर्थसंकल्पात झुकते माप मिळू शकते. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प शिंदे सरकारसाठी महत्त्वाचा आहे.