( मुंबई )
राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे वाढते अपघात लक्षात घेता बसचालकांची मद्यपान चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ही मोहीम गुरुवारी (ता. ३१) पहाटे ५ पासून सुरू झाली आहे. शुक्रवारी सकाळी ७ पर्यंत राज्यभरातील सर्व १०० टक्के चालकांची मद्यपान चाचणी केली जाणार आहे.
चालकांनी रा. प. कर्तव्यावर असताना मद्यपान केल्याबाबतची प्रकरणे अलिकडच्या काळात आढळून आली. रा. प. महामंडळात बहुतांशी आगारात अल्कोटेस्ट मशिन दिल्या असताना स्थानकावर, तसेच मार्गतपासणी दरम्यान मद्यपान करणा-या चालकांची तपासणी होत नाही. याबाबतचे परिपत्रकच काढण्यात आले होते.
त्याची अंमलबजावणी होत नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. त्यामुळे आता महामंडळातील सर्व मार्गावरील प्रामुख्याने महामार्गावरील बसेस मध्यम व लांब पल्ल्यांच्या बसेस, रात्रीच्या प्रवास करणा-या बसेस यावरील चालकांची १०० टक्के मद्यपान तपासणी करण्यासाठी दोन दिवसांची मोहीम राबविली जात आहे.
सुरक्षा व दक्षता शाखा व वाहतूक शाखा यांच्यासह संयुक्त तपासणी कार्यक्रम संपूर्ण राज्यभर राबविला जात आहे. त्याला गुरुवारी पहाटे ५ पासून सुरुवात झाली असून, शुक्रवारी सकाळी ७ वाजेपर्यंत ही तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. त्याचा अहवाल मध्यवर्ती कार्यालयामार्फत एकत्र करून राज्यभरातील मद्यपी चालकांवर कारवाई जात आहे.