(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
राजू काकडे हेल्प अँकॅडमीचा 15 वा वर्धापन दिन श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुख येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थित उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संगमेश्वर तालुक्याच्या तहसिलदार अमृता साबळे, गटविकास अधिकारी भरत चौगले, पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार, देवरुख नगरपंचायतचे मुख्याधिकारी चेतन विसपुते व माजी जि.प. अध्यक्ष रोहन बने व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
अँकॅडमीचे अध्यक्ष श्री. गणेश जंगम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या वर्धापन दिन सोहळ्यात पर्यावरण विषयक कामाबद्दल यंदाचा निसर्गमित्र पुरस्कार युवा कार्यकर्ते तुषार उर्फ मुन्ना थरवळ यांना देऊन सन्मान करण्यात आला. तर स्पर्शज्ञान संस्थेच्या माध्यमातून अंध व्यक्तींना सहकार्य करीत असल्याबद्दल ‘दृष्टिदाती’ हा पुरस्कार रेवा कदम यांना देऊन सन्मानित करण्यात आले. यंदाच्या भीषण पाणी टंचाईचा अंदाज घेऊन पाचशेच्या आसपास बंधारे बांधण्यास प्रवृत्त करणाऱ्या गटविकास अधिकारी भरत चौगले व ‘आपलं देवरुख सुंदर देवरुख’च्या माध्यमातून कचरा व्यवस्थापन, वृक्ष लागवड व हजारो झाडांचे मोफत वाटप करणाऱ्या हेमंत तांबे यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला.
कौतुकास्पद करत असलेल्या कामाची राजू काकडे हेल्प अँकॅडमीने दखल घेऊन पुरस्कार व विशेष सत्कार केल्याबद्दल पुरस्कार प्राप्त व्यक्ती व विशेष सत्कारमूर्तीनी समाधान व्यक्त केले. या पुरस्कार व विशेष सत्कारामुळे उत्साहाने काम करण्याची नवी उमेद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी तर आभार प्रदर्शन राजू काकडे हेल्प अँकॅडमीचे कार्याध्यक्ष नंदकिशोर उर्फ अण्णा बेर्डे यांनी केले.