(राजापूर)
महामार्गचे काम अपूर्ण स्थितीत असताना राजापुरातील हातिवले येथे टोल वसुली सुरू झाल्याने स्थानिकांसह वाहन चालकामध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान राजापुरातील एका शिष्टमंडळाने बुधवारी रत्नागिरी येथे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतल्यानंतर सायंकाळपासून टोल वसुली बंद करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिल्याची माहिती पुढे आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे राजापूर तालुक्यातील वाटूळ ते तळगाव टाकेवाडीपर्यंत रस्त्याचे काम अपूर्ण आहे. अद्यापही अनेक शेतकऱ्यांना न मिळालेला मोबदला, ठेकेदाराने दिलेल्या आश्वासनांची न केलेली पूर्तता यामुळे राजापुरातील हातिवले येथील टोल वसुलीला राजापूरवासियांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. जोपर्यंत ही कामे पूर्ण होत नाहीत आणि स्थानिकांना टोलमाफी दिली जात दिली नाही, तोपर्यंत टोलवसुली करू देणार नाही, असा इशारा देत राजापूरवासियांनी यापूर्वी दोन ते तीनवेळा टोल वसुलीसाठी झालेला प्रयत्न हाणून पाडला होता.
डिसेंबर महिन्यात तर राजापुरातील व्यापारी, वाहनचालक, बागायतदार यांनी सलग 2 दिवस टोलनाक्यावर ठिय्या मांडत टोल वसुली थांबे बंद पाडले होते. त्यावेळी माजी खासदार नीलेश राणे यांनीही राजापूरवासियांच्या लढ्याला पाठिंबा देत ठेकेदाराला टोल वसुली थांबवण्यास भाग पाडले होते. तसेच स्थानिकांच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली केल्यास टोलनाक्यालाच टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर 3 महिने टोल वसुली बंद होती. मात्र नुकताच केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचा महामार्गाची पाहणी दौरा झाला आणि काही दिवसातच राजापूर तालुक्यातील हातिवले येथील टोलनाक्यावर टोल वसुलीला सुरूवात झाली.
गेले 2 दिवस पोलीस बंदोबस्तात टोल वसुली सुरू आहे. दरम्यान बुधवारी राजापुरातील एक शिष्टमंडळ पालकमंत्री उदय सामंत यांची रत्नागिरी येथे जाऊन भेट घेतली. यामध्ये शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख अशफाक हाजू, माजी नगराध्यक्ष हनिफ काझी, माजी नगरसेवक सौरभ खडपे, जि. प. माजी सदस्य अजित नारकर यांच्यासह राजापुरातील व्यापारी, वाहनचालक मालक, बागायतदार उपस्थित होते. यावेळी या शिष्टमंडळाशी चर्चा करुन मंत्री सामंत यांनी टोल वसुली थांबवण्याचे आदेश दिले. तसेच येत्या 8 दिवसांत स्थानिकांसोबत बैठक घेवून महामार्गाचे काम व टोलसंदर्भातील प्रश्न सोडवण्याची ग्वाही त्यांनी दिली.