( राजापूर / वार्ताहर)
तालुक्यातील नाटे ठाकरेवाडी येथील आंबा बागायतदार होलम यांच्या आंबा काजू बागेला आकस्मिक आग लागून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
शनिवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. या आगीत आंबा, काजू तसेच पाण्याचे पाईप जळून गेले आहेत. विजेच्या शॉर्टसर्कीट होवून ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आंबा, काजूचा हंगाम ऐन भरात आलेला असताना तालुक्याच्या ग्रामीण भागात वणवे लागण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. यातून शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान होत असून कुटुंबावर कर्जबाजारी होण्याची वेळ येत आहे. अशीच घटना शुक्रवारी नाटेत घडली. यापुर्वीही गोठीवरे, आंगले, ससाळे परीसरात मोठे वणवे लागून शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. नाटे ठाकरेवाडी येथील श्री.होलम यांच्या बागेमध्ये महावितरणच्या दोन वायर्स एकत्र चिकटल्याने झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. या आगीत श्री. होलम यांची निम्मी बाग जळून खाक झाली. हापूस कलमे, काजु आदीचा समावेश आहे, तर आजुबाजूच्या इतर बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. हा वणवा लागल्याचे श्री. होलम निदर्शनास येताच ग्रामस्थांनी मोठ्या शर्थीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे अन्य शेतकऱ्यांच्या या दुर्घटनेपासून वाचल्या आहेत.