राजापूर : राजापूर तालुक्यातील दळे येथील सतीश यशवंत गिरकर यांना पुण्यातील आर्ट बिटस् महाराष्ट्र कला सन्मान राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
सतीश यांना शिल्पकला, अभिनय या कला विभागात हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून, आर्ट बिटस् फौंडेशन कडून हा पुरस्कार ऑनलाईन पध्दतीने प्रदान करण्यात येणार आहे.
दळे सारख्या ग्रामीण भागात राहून कलाक्षेत्रातील शिक्षण न घेतलेल्या गिरकर यांना मुर्ती कलेचं बाळकडू वडील यशवंत गिरकर आणि भाऊ यांच्या कडून मिळाले. असताना चित्रकलेत विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे, सध्या मुंबईत वास्तव्य असलेल्या गिरकर यांनी तेथील मुर्ती कला स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच हौशी रंगभूमी वर कला वैभव नाट्य संघ जैतापूर आणि आम्ही सारे ग्रुप जैतापूर या नाट्य संस्थातून अभिनय आणि नेपथ्य करताना विविध एकांकिका स्पर्धेत यश संपादले आहे.
या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.या पुरस्काराचे श्रेय वडील, भाऊ संतोष आणि मनोज, पत्नी. अभिनयातील गुरू कला वैभव नाट्य संघाचे डी.एस. पाटील सर, राजन लाड, सुनील करगुटकर आणि मित्र परिवार यांना दिले आहे. सन्मान चिन्ह, सन्मान पत्र आणि मेडल असं पुरस्कार स्वरूप असून ते लवकरच आँनलाईन पद्धतीने प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्काराची माहिती देतांना आर्ट बिटस् पुणे या संस्थेचे संस्थापक संचालक संतोष पांचाळ म्हणाले की आर्ट बिटस् ही संस्था गेली वीस वर्षे सातत्याने चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य आणि लोककला या विभागातील कला आणि कलाकारांना सक्षम व्यासपीठ व प्रोत्साहन देण्यासाठी काम करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून कलाकारांसाठी अनेक उत्तम उपक्रम राबविले जातात.